हिंदुस्थानला वर्ल्ड कप तिकीट, उपांत्य फेरीत इटलीचा केला पराभव; आता हॉकी पात्रता फेरीच्या जेतेपदाचे लक्ष्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एफआयएच महिला विश्वचषक पात्रता स्पर्धेच्या उपांत्य फेरीत हिंदुस्थानने इटलीवर 1-0 असा थरारक विजय मिळवत केवळ अंतिम फेरीत धडक मारली नाही, तर महिला हॉकी वर्ल्ड कपसाठीही आपले स्थान पक्के केले. मनीषा चौहानच्या निर्णायक गोलच्या जोरावर हिंदुस्थानी संघाने हा महत्त्वाचा अडथळा पार करत दुहेरी यश संपादले.

सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये हिंदुस्थानी खेळाडूंना आक्रमणाची लय सापडत नव्हती. पासेसमधील चुका आणि चेंडूवरील नियंत्रण कमी पडल्याने गोलच्या संधी निर्माण होत नव्हत्या. दुसरीकडे इटलीची लोला ब्रेआ सातत्याने धोकादायक ठरत होती. मात्र हिंदुस्थानची गोलरक्षक बिचू देवीने दोन महत्त्वाचे बचाव करत संघाला दिलासा दिला.

तिसऱया क्वार्टरमध्ये अखेर हिंदुस्थानला यश मिळाले. मनीषा चौहानच्या ड्रगफ्लिकला प्रथम रक्षकाचा आणि नंतर गोललाईनवरील बचावपटूचा स्पर्श होत चेंडू जाळ्यात गेला आणि हिंदुस्थानने आघाडी घेतली. अखेरच्या क्षणी इटलीला पेनल्टी कॉर्नरची संधी मिळाली होती. मात्र इव्हाना पेस्सिनाच्या जोरदार ड्रगफ्लिकला बिचू देवीने शानदार बचाव करत हिंदुस्थानचा विजय आणि वर्ल्ड कपचे तिकीट निश्चित केले. या विजयामुळे हिंदुस्थानी महिला हॉकी संघाचा आत्मविश्वास उंचावला असून आता अंतिम फेरीत इंग्लंडविरुद्ध विजेतेपदासाठी लढण्याचा निर्धार संघाने केला आहे.