
टी-20 क्रिकेटमध्ये महासत्ता असलेल्या हिंदुस्थानने जगात महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या संघाचा पराभव करत विजयी सुरुवात केली. सूर्यकुमार यादवच्या संकटमोचक 49 चेंडूंतील 84 धावांच्या स्पह्टक खेळीने उभारलेल्या 161 धावांच्या आव्हानासमोर हिंदुस्थानच्या गोलंदाजांनी अमेरिकन फलंदाजांना 132 धावांत रोखत 29 धावांनी विजय नोंदवत सुपर एट प्रवेशाच्या दिशेने आपले पहिले पाऊल टाकले. फलंदाजीत चमत्कारिक फलंदाजी करणारा सूर्यकुमार आजच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
वानखेडेवर वादळ, त्सुनामी, षटकारांची आतषबाजी होणार, अशी भविष्यवाणी होती. पण जे हिंदुस्थानी फलंदाजांना जमले नाही ते गोलंदाजांनी केले. 162 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या अमेरिकेला प्रारंभापासून शेवटपर्यंत विजयापासून दूर ठेवण्याची किमया गोलंदाजांनी साधली. मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंगच्या दणकेबाज सुरुवातीनंतर अमेरिकन फलंदाजांना हिंदुस्थानी आव्हान पेलवलेच नाही, मात्र मिलिंद कुमार (34), संजय कृष्णमूर्ती (37) आणि शुभम रांजणे (37) या मधल्याफळीतील फलंदाजांच्या फटकेबाजीमुळे अमेरिका 20 षटकांत 8 बाद 132 धावांपर्यंत पोहोचली. जसप्रीत बुमराच्या अनुपस्थितीमुळे अचानक स्थान मिळवणारा मोहम्मद सिराज सर्वात यशस्वी ठरला. त्याने 3 तर अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेलने प्रत्येकी दोन-दोन विकेट टिपल्या.


























































