
शनिवारीच आगामी आशिया कपचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. मात्र पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळण्याबाबत गेले काही दिवस माध्यमांवर येत असलेले वृत्त ऐकून आशिया क्रिकेट परिषदही (एसीसी) हादरली आहे. हिंदुस्थानी संघ आशिया कप क्रिकेट स्पर्धेमधून माघार घेणार असल्याच्या चर्चांना एसीसीच्या उच्चस्तरीय सूत्रांनी फेटाळून लावलेय आणि हिंदुस्थानसारख्या सदस्य देशाला या स्पर्धेतून एकतर्फी माघार घेण्याचा अधिकार नसल्याचे त्यांनी स्पष्ट करत हिंदुस्थानी संघ यंदा खेळणार असल्याचे सांगितलेय.
एकीकडे एसीसीने आशिया कप स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर केला आहे आणि हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्याचीही माहिती दिलीय. त्यातच हिंदुस्थानात सुरू असलेल्या चर्चांमुळे एसीसीला स्पर्धेविषयी आपली भूमिका परखडपणे मांडावी लागलीय. आशिया कप ही बहुराष्ट्रीय स्पर्धा आहे आणि यामध्ये कोणत्याही सदस्य देशाने एकतर्फी माघार घेणे शक्य नाही. यासाठी परिषदेची औपचारिक परवानगी आवश्यक असते, मात्र बीसीसीआय या स्पर्धेची यजमान असल्यामुळे ते कधीही आपल्या कार्यक्रमात बदल करू शकतात. तसेच या स्पर्धेचा पूर्ण कार्यक्रम बीसीसीआयच्या निर्देशानुसारच झालेय. त्यामुळे स्पर्धा ठरलेल्या कार्यक्रमानुसारच होणार असल्याचेही एसीसीने स्पष्ट केलेय.
आशिया कपचे भवितव्य हिंदुस्थानी संघावरच
हिंदुस्थान हा आशियाई क्रिकेट परिषदेचा सर्वात प्रभावशाली सदस्य असून स्पर्धेतील त्याचा सहभाग प्रसारण हक्क, प्रेक्षकसंख्या आणि आर्थिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे हिंदुस्थानी संघाने माघार घेतल्यास स्पर्धेच्या आयोजनावर आणि उत्पन्नावर मोठा परिणाम होऊ शकतो. पहलगाम हल्ल्यामुळे स्पर्धेबाबत साशंकता निर्माण झाली होती. तसेच गेल्याच आठवडय़ात हिंदुस्थानच्या लिजंड संघाने पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळण्यास नकार दिला होता. त्यामुळे आशिया कपमधूनही हिंदुस्थान माघार घेण्याचे बोलले जात होते, मात्र तूर्तास बीसीसीआयने स्पर्धेला होकार कळवला आहे.






























































