Iran US Israel War – 345 मच्छीमार, हजारो मैलांचा प्रवास अन् एका मित्राची साथ! संकट काळात ‘देवदूत’ ठरलेल्या देशाचे हिंदुस्थानने मानले आभार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य पूर्वेमध्ये इराण, अमेरिका आणि इस्रायलमध्ये 28 फेब्रुवारीपासून भीषण युद्ध सुरू आहे. अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे प्रचंड नुकसान झाले आहे. इराणचे लष्करी तळ अमेरिका-इस्रायलने उद्ध्वस्त केले असून प्रत्युत्तरादाखल इराणनेही आखातातील अमेरिकन तळांना लक्ष्य केले आहे. दोन्ही बाजूने एकमेकांवर प्रचंड हल्ले सुरू असतानाच एका मित्र देशाच्या मदतीने हिंदुस्थानने इराणमध्ये अडकलेल्या 345 मच्छीमारांची सुखरूप सुटका केली आहे. शनिवारी हे मच्छीमार हिंदुस्थानमध्ये परतले.

फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस अमेरिका-इस्रायलने संयुक्तपणे इराणवर कारवाई करत हवाई हल्ले केले. त्यानंतर आखातामध्ये युद्धाचा भडका उडाला. अचानक सुरू झालेल्या या युद्धामुळे शेकडो लोक या भागामध्ये अडकले, त्यांच्या सुखरूप सुटकेसाठी सरकारकडून पावले उचलली जात आहेत. इराणमध्ये अडकलेल्या नागरिकांना आर्मेनिया आणि अझरबैजानची सीमा ओलांडून हिंदुस्थानमध्ये आणले जात आहेत.

शनिवारी इराणमध्ये अडकलेले 345 हिंदुस्थानी मच्छीमार सुखरूप मायदेशी परतले आहेत. आर्मेनियामार्गे या मच्छिमारांना चेन्नईमध्ये आणण्यात आले. चेन्नईमध्ये विमान उतरल्यानंतर या मच्छीमारांचे विमानतळावर स्वागतही करण्यात आले. आर्मेनियाच्या सहकार्यामुळे या मच्छीमारांची सुटका करण्यात आली असून हिंदुस्थानने आर्मेनियाचे आभारही मानले आहेत.

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी या मोहिमेच्या यशाबद्दल आर्मेनियाचे परराष्ट्र मंत्री अरारत मिर्झोयान आणि तेथील सरकारचे आभार मानले आहेत. जयशंकर यांनी सोशल मीडियाद्वारे माहिती दिली की, इराणमधून हिंदुस्थानी मच्छिमारांना बाहेर काढून आर्मेनियामार्गे हिंदुस्थानात आणण्यासाठी आर्मेनिया सरकारने मोलाचे सहकार्य केले. दरम्यान, इराणमधील युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत 1500 हून अधिक हिंदुस्थानी नागरिक आर्मेनिया आणि अझरबैजानच्या जमिनीवरील सीमा ओलांडून मायदेशी परतले आहेत, अशी माहिती पीटीआयने दिली आहे.

अबू धाबीमध्ये 5 हिंदुस्थानी जखमी

मच्छीमारांच्या सुटकेची माहिती देतानाच सरकारने अबू धाबीतील परिस्थितीवरही भाष्य केले आहे. शुक्रवारी अबू धाबी येथे झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात 5 भारतीय नागरिक जखमी झाले आहेत. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार क्षेपणास्त्र हवेतच पाडल्यानंतर पडलेल्या अवशेषांमुळे एकूण 12 जण जखमी झाले, ज्यात हिंदुस्थानी नागरिकांचाही आहे. पाच जखमी हिंदुस्थानी नागरिकांपैकी चौघांना उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून एकावर उपचार सुरू आहेत.