देशाच्या खजिन्यातील 1.28 लाख कोटी रुपयांचे सोनं गायब, आरबीआयच्या ताज्या आकडेवारीने खळबळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) शुक्रवारी जाहीर केलेल्या परकीय चलन साठ्याच्या (फॉरेक्स रिझर्व्ह) ताज्या आकडेवारीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. केवळ एका आठवड्यात देशाच्या सोन्याच्या साठ्यात सुमारे 1.28 लाख कोटी रुपयांची घट झाली असून गोल्ड रिझर्व्हमध्ये 14 अब्ज डॉलरहून अधिक घसरण नोंदवली गेली आहे. मात्र त्याच काळात परकीय चलन मालमत्तेत 7.50 अब्ज डॉलरहून अधिक वाढ झाली. परिणामी देशाच्या एकूण परकीय चलनात 6.7 अब्ज डॉलरची घट झाली आहे.

या घसरणीमुळे देशाचा परकीय चलन साठा आयुष्यभरातील उच्चांकावरून खाली आला आहे. यापूर्वीच्या आठवड्यात देशाच्या परकीय चलनात 14 अब्ज डॉलरहून अधिक वाढ झाली होती आणि त्यात प्रमुख वाटा सोन्याच्या साठ्याचा होता. त्याच वेळी परकीय चलन मालमत्तेत सुमारे 500 दशलक्ष डॉलरची घट नोंदवली गेली होती.

आरबीआयच्या माहितीनुसार, 6 फेब्रुवारीला संपलेल्या आठवड्यात हिंदुस्थानचा परकीय चलन साठा 6.711 अब्ज डॉलरने घटून 717.064 अब्ज डॉलरवर आला. त्याआधीच्या आठवड्यात हा साठा 14.361 अब्ज डॉलरने वाढून 723.774 अब्ज डॉलर या विक्रमी पातळीवर पोहोचला होता. सलग चार आठवडे वाढ झाल्यानंतर आता साठ्यात घट नोंदवली गेली आहे. या चार आठवड्यांत एकूण 36.97 अब्ज डॉलरची वाढ झाली होती. तज्ज्ञांच्या मते, युरोपियन युनियन आणि त्यानंतर अमेरिकेसोबत झालेल्या व्यापार करारांमुळे साठ्यात वाढ झाली होती.