देशात महागाई वाढली, अन्नधान्य आणि उत्पादन क्षेत्रातल्या विविध वस्तूंच्या किंमतीतही वाढ

डिसेंबर 2025 मध्ये घाऊक बाजारातील महागाई सलग दुसऱ्या महिन्यात वाढली असून हा दर 0.83 टक्क्यांवर पोहोचला आहे. अन्नधान्य, बिगर-अन्न वस्तू तसेच उत्पादन क्षेत्रातील विविध वस्तूंच्या किमतींमध्ये महिन्याच्या तुलनेत वाढ झाल्यामुळे ही महागाई वाढल्याचे बुधवारी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

घाऊक मूल्य निर्देशांकावर (WPI) आधारित माहितीनुसार, नोव्हेंबरमध्ये घाऊक महागाई उणे 0.32 टक्के, तर ऑक्टोबरमध्ये उणे 1.21 टक्के इतकी होती. याच्या तुलनेत डिसेंबर 2024 मध्ये घाऊक महागाई 2.57 टक्के नोंदवण्यात आली होती. उद्योग मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डिसेंबर 2025 मध्ये उत्पादन क्षेत्रातील वस्तू, खनिजे, यंत्रसामग्री व उपकरणे, अन्नपदार्थांचे उत्पादन आणि वस्त्रांच्या किमती वाढल्यामुळे घाऊक महागाईत वाढ झाली.

घाऊक मूल्य निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार, डिसेंबरमध्ये अन्नपदार्थांच्या किमतींमध्ये 0.43 टक्क्यांची घट झाली आहे. नोव्हेंबरमध्ये ही घट 4.16 टक्के इतकी होती. भाजीपाल्याच्या महागाई दरात डिसेंबरमध्ये 3.50 टक्क्यांची घट नोंदवण्यात आली, तर नोव्हेंबरमध्ये भाजीपाल्याचा महागाई दर 20.23 टक्के होता.

उत्पादित वस्तूंच्या बाबतीत घाऊक महागाई नोव्हेंबर 2025 मधील 1.33 टक्क्यांवरून डिसेंबरमध्ये 1.82 टक्के झाली आहे. बिगर-अन्न वस्तूंच्या श्रेणीत घाऊक महागाई डिसेंबरमध्ये 2.95 टक्के, तर नोव्हेंबरमध्ये 2.27 टक्के होती. इंधन आणि वीज क्षेत्रातील घाऊक महागाई डिसेंबरमध्ये 2.31 टक्के, तर नोव्हेंबरमध्ये 2.27 टक्के इतकी नोंदवण्यात आली आहे.