
गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या काहिलीने हैराण झालेल्या मुंबईकरांसाठी आणि दुष्काळाने होरपळलेल्या बळीराजासाठी आनंदाची बातमी आहे. मान्सून 48 तासांत कोकणात दाखल होणार असून 10 जूनपर्यंत मुंबईत तर 15 जूनपर्यंत विदर्भ–मराठवाडय़ासह संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मान्सूनसाठी सध्या पोषक वातावरण आहे. त्यामुळेच केरळमध्ये मान्सून वेळेच्या आधीच दाखल झाला. लवकरच कोकणात मुसळधार पावसाला सुरुवात होईल. त्यानंतर मान्सूनसाठी मुंबई दूर नही अशीच स्थिती असणार आहे. राज्यात अनेक भागांत पारा 40हून अधिकच असून मुंबईतही आर्द्रतायुक्त वारे अरबी समुद्रावरून वाहत असल्याने असह्य उकाडा आहे. त्यामुळे अंगातून अक्षरशः घामाच्या धारा वाहत आहेत.
30 वर्षांचा पायंडा मोडणार
मान्सून दरवर्षीप्रमाणे 10 जून रोजी म्हणजेच वेळेत दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र मान्सून कोकणात दाखल झाल्यानंतर लगेचच मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र वाऱयाचा वेग चांगला राहिल्यास वेळेच्या आधीही मान्सून मुंबईत दाखल होऊ शकतो. त्यामुळे गेल्या 30 वर्षांचा मान्सून दाखल होण्याचा पायंडा यंदा मोडून पडण्याची शक्यता आहे.
मुंबई, ठाण्यात पावसाचा शिडकावा
मुंबईसह उपनगरात, ठाणे, कल्याण, कर्जतपर्यंत पावसाचा शिडकावा झाला. हवामान अधूनमधून ढगाळ होते. दुपारपासून मात्र उन्हाचा कडाका वाढला. मुंबईतही 34 ते 36 अंश डिग्री सेल्सियस इतक्या पाऱयाची नोंद झाली. दरम्यान, मान्सूनसाठी पोषक वातावरण असल्याने वेळेच्या आधीही मान्सून मुंबईत दाखल होईल आणि 10 ते 15 जूनच्या दरम्यान दमदार पाऊस कोसळेल अशी शक्यता स्कायमेटचे महेश पलावत आणि राज्याच्या कृषी विभागाचे माजी संचालक आणि हवामानतज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केली.