हिंदुस्थान जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले

जपानला मागे टाकून हिंदुस्थान जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनल्याचा दावा नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बीव्हीआर सुब्रह्मण्यम यांनी केला आहे. भूराजकीय आणि आर्थिक वातावरण हिंदुस्थानसाठी पोषक असून आपण 4.186 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजेच तब्बल 340 लाख कोटी रुपयांची अर्थव्यवस्था उभारली आहे, असेही सुब्रह्मण्यम यांनी म्हटले आहे. नीती आयोगाच्या दहाव्या गर्व्हनिंग काऊन्सिलच्या बैठकीनंतर सुब्रह्मण्यम प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 2024 पर्यंत हिंदुस्थान पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होती, परंतु आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अहवालानुसार आता हिंदुस्थान चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे तर जपान पाचव्या स्थानी आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था 30.51 ट्रिलियन डॉलर्ससह जगात पहिल्या स्थानी आहे. त्यानंतर चीन आणि जर्मनीचा क्रमांक लागतो.