IND vs PAK WCL 2025 – ‘देश प्रथम’ म्हणत पाकड्यांसोबत खेळण्यास खेळाडूंचा नकार; अखेर हिंदुस्थान-पाकिस्तान सामना रद्द

वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्समध्ये रविवारी हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये सामना खेळला जाणार होता. मात्र देश प्रथम म्हणत हिंदुस्थानच्या अनेक खेळाडूंनी पाकड्यांसोबत मैदानात उतरण्यास नकार दिला. यामुळे हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील सामना रद्द करण्यात आला आहे. आयोजकांनी सोशल मीडियावर ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

हिंदुस्थान आणि पाकिस्तान सामना एजबॅस्टन मैदानावर होणार होता. मात्र हिंदुस्थानच्या पाच खेळाडूंनी हा सामना खेळण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. हरभजन सिंग, सुरेश रैना, युसूफ पठाण, इरफान पठाण आणि शिखर धवन यांनी या लढतीतून माघार घेतली होती. त्यामुळे आयोजकांना सामना रद्द करावा लागला. याबाबत वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीग आणि एजबॅस्टन स्टेडियमनेही ट्विट करत माहिती दिली.

वर्ल्ड चॅम्पियनशिप लीगच्या आयोजकांनी 20 जुलै रोजी हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये होणारा सामना रद्द झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी हा मैदानावर येऊ नये. सर्व प्रेक्षकांचे तिकिटाचे पैसे परत केले जातील. हिंदुस्थान-पाकिस्तान सामना रद्द झाला असला तरी लीगचे इतर सर्व सामने वेळापत्रकानुसार पार पडतील, असे एजबॅस्टन स्टेडियमने आपल्या एक्स अकाऊंटवर म्हटले आहे.

जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थान-पाकिस्तानमधील संबंध ताणलेले आहेत. याचा पडसाद खेळाच्या मैदानातही उमटले असून वर्ल्ड चॅम्पियनशिप लीगमध्ये हिंदुस्थान-पाकिस्तान सामना रद्द करावा लागला आहे. युवराज सिंहच्या नेतृत्वाखाली या लीगसाठी मैदानात उतरलेल्या हिंदुस्थानच्या बहुतांश खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला. त्यामुळे सामना रद्द करावा लागला. हिंदुस्थानचा या स्पर्धेतील हा पहिलाच सामना होता.