
ऑपरेशन सिंदूरच्या तडाख्यात पाकव्याप्त कश्मीर आणि पाकिस्तानातील तब्बल 100 हून दहशतवादी आणि 40 सैनिक मारले गेल्याची माहिती लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी दिली. तसेच शस्त्रसंधीचे उल्लंघन पाकिस्तानने केले, त्यामुळे आता शस्त्रसंधी उरली नसून जर त्यांच्याकडून हल्ले झाले तर मोठी अॅक्शन घेऊ असा सज्जड दमही दिला. हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाल्याच्या 25 तासांनंतर आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास तिन्ही सैन्यदलांनी 1 तास 10 मिनिटांची पत्रकार परिषद घेतली. डायरेक्टर जनरल ऑफ मिलिट्री ऑपरेशन लेफ्टनंट जनरल राजीव घई, व्हाईस अॅडमिरल एएन प्रमोद आणि एयर मार्शल अवधेश कुमार भारती यांनी ऑपरेशन सिंदूर मोहिमेत पाकिस्तानमध्ये केलेल्या कारवाईची माहिती दिली.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांना क्रूरपणे मारण्यात आले होते, हे सर्वांनाच माहीत आहे. त्यानंतर हिंदुस्थानी लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त कश्मीरमधील दहशतवाद्यांच्या 9 तळांना लक्ष्य केले. 7 मे रोजी 9 दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यात 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले. यात कंदहार हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील 3 मोस्ट वॉण्टेड दहशतवाद्यांचाही समावेश होता. त्यानंतर पाकिस्तानने हिंदुस्थानातील लष्करी तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांचा हा प्रयत्न आम्ही हाणून पाडला. पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले. या कारवाईत पाकिस्तानी सैन्याचे 35 ते 40 सैनिक आणि अधिकारी मारले गेले. नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात हिंदुस्थानचे 5 जवान शहीद झाल्याचे राजीव घई यांनी सांगितले.
पाकिस्तानच्या लष्करी मालमत्तांवर हल्ला
हिंदुस्थानने पाकिस्तानच्या महत्वाच्या लष्करी मालमत्तांवर हल्ला केला. यात एअर बेस, कमांड सेंटर्स, लष्करी पायाभूत सुविधा आणि एअर डिफेन्स सिस्टम यांचा समावेश होता. हिंदुस्थानी लष्कराने पाकिस्तानी लष्कराच्या पसरूर, चुनियान, आरिफवाला या रडार यंत्रणेला आणि भुलारी, जैककाबाद, चकलाला, रहिमयार, सरगोधा या एअरफील्डला लक्ष्य केले आणि पाकिस्तानी लष्कराचे प्रचंड नुकसान केल्याचे लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी सांगितले.
दहशतवादी आणि त्यांचे तळ लक्ष्य
आम्ही दहशतवादी आणि त्यांच्या तळांना लक्ष्य केले. त्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर नेस्तनाबूत केले. पाकिस्तानी सैन्यदलांचे तळ किंवा कुठल्याही नागरी वस्त्यांना लक्ष्य केले नाही. मुरीदके येथील दहशतवादी कॅम्पवर आकाशातून जमिनीवर मारा करणाऱया 4 क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला केला आणि त्यांचे दळ उद्ध्वस्त केल्याचे एयरमार्शल भारती यांनी सांगितले. मुरीदके दहशतवादी कॅम्पनंतर बहावलपूर प्रशिक्षण तळावरही आम्ही हल्ला केला आणि दहशतवाद्यांचा हा तळ उद्ध्वस्त केल्याचे ते म्हणाले.
पाकिस्तानलाही माहीत आहे हिंदुस्थान काय करेल?
समोरून जी कारवाई होईल त्याला त्याप्रमाणात प्रत्युत्तर देण्याचे धोरण हिंदुस्थानच्या तिन्ही सैन्यदलांचे आहे. यावेळी जर पाकिस्तानने आणखी काही कारवाई करण्याची किंवा हल्ले करण्याची हिंमत केली तर पाकिस्तानही माहिती आहे की, आम्ही काय करू शकतो असा इशारा नौदलाचे डीजीएमओ व्हाईस अॅdडमिरल ए एन प्रमोद यांनी दिला. आपले लष्कर पाकिस्तानपेक्षाही दर्जात्मकदृष्टय़ा आणि संख्यात्मकदृष्टय़ाही वरचढ असून आपण शत्रूला मोठे नुकसान पोहोचवू शकतो. समुद्री आघाडीवरही आपले पूर्णपणे वर्चस्व आहे, असे ते म्हणाले.
हे युद्धापेक्षा कमी नाही
गेल्या काही दिवसांपासून जे काही सुरू आहे ते कोणत्याही युद्धापेक्षा कमी नाही. सामान्य परिस्थितीत दोन देशांचे हवाई दल अॅक्शन घेत नाहीत. एकमेकांवर हवाई हल्ले करत नाहीत. रोज रात्री घुसखोरी होत नाही, असे लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले.
पाकिस्तानी सैन्याच्या तुकडय़ांची घुसखोरी
नियंत्रण रेषेवर होत असलेल्या गोळीबारात घुसखोरीचा प्रयत्न होत आहे. अशावेळी दहशतवादी घुसखोरी करतात, परंतु आम्हाला अशी माहिती मिळाली आहे की कदाचित ते दहशतवादी नसून पाकिस्तानी लष्कराच्या तुकडय़ाही असू शकतात. हिंदुस्थानी लष्कराच्या चौक्यांवर हल्ला करण्याच्या त्यांचा प्रयत्न असू शकतो, परंतु याला युद्धकृती मानले जाऊ शकते. असे असले तरी पुढे काय होईल याचा अंदाज बांधता येणार नाही. प्रत्येक परिस्थिती वेगळी असते. त्या परिस्थितीला वेगळ्या प्रकारे उत्तर दिले जाते, याकडेही लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी लक्ष वेधले.