हरयाणाची युट्यूबर निघाली गद्दार! पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याने ज्योती मल्होत्राला अटक

ऑपरेशन सिंदूरनंतर हिंदुस्थान पाकिस्तानमध्ये युद्धबंदी झाली असली तरी तणाव कायम आहे. अशातच आता हरयाणा येथील युट्यूबर ज्योती मल्होत्रा​हिला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत पंजाब आणि हरयाणातील मालेरकोटला येथून एकूण 6 पाकिस्तानी हेरांना अटक करण्यात आली आहे.

ज्योती मल्होत्रा पाकिस्तान उच्चायुक्तालयात काम करणाऱ्या दानिश नावाच्या अधिकाऱ्याच्या संपर्कात होती. दानिशने तिला पाकिस्तानला पाठवले होते. ज्योती मल्होत्रा स्वतःचे ट्रॅव्हल चॅनल चालवते. याच आधारावर ती पाकिस्तानलाही गेली होती. तिथे जाऊन तिने अनेक गुप्त माहिती शेअर केली असल्याची माहिती आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर संरक्षण बजेट वाढवणार, संरक्षण मंत्रालयाचा 50 हजार कोटी वाढवण्याचा प्रस्ताव

दरम्यान, पोलिसांनी तिची चौकशी सुरू केली आहे. चौकशीदरम्यान ज्योती मल्होत्राबाबत पोलिसांना अनेक गोष्टींची माहिती मिळाली. तिचे ‘ट्रॅव्हल विथ-जो’ नावाचे युट्यूब चॅनेल आहे. ती पासपोर्टधारक असून 2023 मध्ये पाकिस्तानला गेली होती. पाकिस्तानला जाण्यासाठी व्हिसा मिळविण्यासाठी ती दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात गेली होती. जिथे तिची भेट अहसान-उर-रहीम उर्फ दानिशशी झाली. यावेळी तिने दानिशचा मोबाईल नंबर घेतला आणि नंतर त्याच्याशी बोलू लागली.

दानिशसोबत मैत्री झाल्यावर ज्योती दोनवेळा पाकिस्तानला गेली होती. तिथे दानिशच्या सल्ल्यानुसार ती त्याचा ओळखीचा अली अहवानला भेटली. अलीने ज्योतीची राहण्याची आणि प्रवासाची व्यवस्था केली होती. एवढेच नाही तर अली अहवानने पाकिस्तानी सुरक्षा आणि गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत ज्योतीची बैठक आयोजित केली. तिथेच ती शाकीर आणि राणा शाहबाज या दोन व्यक्तींनाही भेटली. तिने शाकीरचा मोबाईल नंबर घेतला आणि जट रधांवा या नावाने सेव्ह केला. यानंतर ती हिंदुस्थानात परतली.

पाकिस्तानातून हिंदुस्थाानात आल्यावर ज्योती व्हॉट्अॅपवर, स्नॅपचॅट, आणि टेलिग्रॉम सारख्या सोशल मीडियावरच्या माध्यमातून सर्वांशी सतत संपर्कात राहिली. ती हिंदुस्थानची माहिती पाकिस्तानात पोहोचवत राहिली. ज्योती वारंवार दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकारी अहसान-उर-रहीम उर्फ दानिशला भेटत होती. ज्योतीच्या चौकशीदरम्यान ती पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या संपर्कात असल्याचे आढळून आले. त्यामुळे आता ज्योतीला अटक करण्यात आली आहे. तिची सखोल चौकशी केली जात आहे.

मध्यरात्री फोन, ऑपरेशन सिंदूरमुळे मोठे नुकसान; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली