हिंदुस्थान शस्त्रास्त्रे आयातीत दुसऱ्या स्थानी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिटय़ूट या जागतिक संशोधन संस्थेने प्रसिद्ध केलेल्या नव्या अहवालानुसार 2021 ते 2025 या कालावधीत हिंदुस्थान हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा शस्त्र आयातदार देश ठरला आहे. या कालावधीत जगभरातील एकूण शस्त्र आयातीपैकी 8.2 टक्के वाटा हिंदुस्थानचा होता.

अहवालानुसार हिंदुस्थानने अलीकडच्या काही वर्षांत आपल्या संरक्षण क्षमतेत वाढ करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर परदेशातून आधुनिक शस्त्रास्त्रे, क्षेपणास्त्रे, विमान प्रणाली आणि संरक्षण तंत्रज्ञान खरेदी केले आहे. चीन आणि पाकिस्तानसोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानची शस्त्र खरेदी वाढली. प्रादेशिक सुरक्षा आव्हाने आणि सैन्य आधुनिकीकरणाची गरज हे अन्य घटकही कारणीभूत असल्याचे  तज्ञांचे मत आहे. असे असले तरी 2016 ते 2020 या कालावधीच्या तुलनेत शस्त्रास्त्र खरेदीत 4 टक्के घट दिसून आलीय.

रशिया सर्वात मोठा पुरवठादार

दीर्घकाळ भारताचा प्रमुख शस्त्र पुरवठादार रशिया राहिला आहे. मात्र गेल्या काही वर्षांत हिंदुस्थानने रशियावरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याऐवजी अमेरिका, फ्रान्स आणि इस्रायल यांसारख्या पाश्चात्त्य देशांकडून शस्त्र खरेदी वाढवली जात असल्याचे अहवालात नमूद केले आहे. तरीही 2021-2025 या कालावधीत हिंदुस्थान हा रशियाचा सर्वात मोठा ग्राहक राहिल्याचेही या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.

क्षेपणास्त्रे आणि एअर डिफेन्स यंत्रणा

हिंदुस्थानने आयात केलेल्या शस्त्रांमध्ये क्षेपणास्त्रे, रडार व सेन्सर प्रणाली, हवाई संरक्षण प्रणाली आणि इतर प्रगत लष्करी उपकरणांचा मोठा वाटा आहे. या प्रणालींचा उपयोग देशाच्या सीमावर्ती भागांचे निरीक्षण, हवाई हल्ल्यांपासून संरक्षण आणि अचूक हल्ल्यांची क्षमता वाढवण्यासाठी केला जातो.

विशेषतः चीन आणि पाकिस्तान या दोन सीमांवरील सुरक्षा परिस्थिती लक्षात घेता सैन्याचे आधुनिकीकरण वेगाने सुरू आहे. यासाठी आधुनिक लढाऊ विमाने, पाणबुडय़ा, ड्रोन, क्षेपणास्त्र प्रणाली आणि प्रगत निगराणी उपकरणे खरेदी करण्यात आली आहेत.