
इंग्लंडचे बॅझबॉल अखेर हिंदुस्थानी महाआव्हानापुढे नतमस्तक झाले आणि एजबॅस्टनवर गेल्या 58 वर्षांत जे घडले नव्हते ते शुभमन गिलच्या नव्या योद्ध्यांनी करून दाखवले. हिंदुस्थानचे 608 धावांचे जबर आव्हान इंग्लंडच्या धडाकेबाज फलंदाजांना पेलवले नाही. हिंदुस्थानच्या आकाश दीपने आपली सर्वोत्तम कामगिरी करताना इंग्लंडचा डाव 271 धावांत संपवला आणि 336 धावांचा महाविजय नोंदवत हिंदुस्थानच्या नव्या पर्वाचा ‘शुभ’ आरंभ केला. एजबॅस्टनवरील हा पहिलाच विजय असला तरी हिंदुस्थानने इंग्लंड भूमीवरील आपल्या विजयाची दशकपूर्ती साजरी केली आणि पाच कसोटी सामन्यांच्या अॅण्डरसन-तेंडुलकर ट्रॉफीमध्ये 1-1 अशी बरोबरी साधली. आता येत्या 10 जुलैला ऐतिहासिक लॉर्ड्सवर विजयाची मालिका कायम राखण्यासाठी हिंदुस्थान यजमानांशी भिडेल.
पावसाने धाकधूक वाढवली…
इंग्लंडसमोर शेवटच्या दिवशी 536 धावांचे अशक्य आव्हान होते. त्यातच त्यांची कालच 3 बाद 72 अशी बिकट अवस्था झाली होती. त्यामुळे आज दोन गोष्टींची शक्यता होती. एक म्हणजे हिंदुस्थान कसोटी जिंकणार किंवा इंग्लंड कसोटी अनिर्णित राखणार. पण सकाळी सामना सुरू होण्यापूर्वीच पावसाने हजेरी लावत इंग्लंडच्या चेहऱ्यावर हास्य आणले होते, तर हिंदुस्थानी चेहरे चिंतेने भिजले होते. तब्बल तासाभराचा खेळ वाया गेल्यामुळे सामना उशीर सुरू झाला खरा, पण सामना सुरू होताच ओल्या खेळपट्टीने हिंदुस्थानची चिंता दूर केली. हिंदुस्थान संघाची आणि चाहत्यांची धाकधूक क्षणार्धात इंग्लंडची डोकेदुखी बनली.
आकाश दीपने विजय निश्चित केला
पावसाच्या विश्रांतीनंतर खेळ सुरू झाला आणि आकाशच्या चेंडूंनी ढगाळ वातावरणात विजयाचे दीप प्रज्वलित केले. त्याने आधी ओली पोपचा त्रिफळा उडवला आणि मग पुढच्याच षटकांत हॅरी ब्रूकला पायचीत करून इंग्लंडची धाकधूक वाढवली. सलग दोन षटकांत दिलेल्या या धक्क्यांनी इंग्लंडचा पराभव जवळजवळ निश्चित केला. 5 बाद 83 या स्थितीमुळे इंग्लंड विजयापासून 525 धावा दूर होता. हिंदुस्थानला आपल्या कसोटी इतिहासातील सर्वात मोठ्या विजयाची नोंद करण्याची सुवर्णसंधी होती. मात्र पहिल्या डावात हिंदुस्थानी गोलंदाजांना नामोहरम करणाऱ्या जॅमी स्मिथने दुसऱ्या डावातही आपला दणका दिला. त्याच्या 88 धावांच्या झंझावाताने हिंदुस्थानचा पराभव लांबवला. पण आकाश दीपने त्याची विकेट काढत हिंदुस्थानला पुन्हा विजयासमीप आणले. मग पराभव लांबवण्याची ब्रायडन कार्सची धडपडही आकाशनेच संपवत आपला सहावा विकेट टिपत हिंदुस्थानच्या महाविजयावर शिक्कामोर्तब केले. त्याने 99 धावांत 6 विकेट टिपत त्याने कसोटीत 187 धावांत 10 विकेट टिपण्याचा पराक्रम प्रथमच केला. कसोटीत 269 आणि 161 अशा खेळ्या करणारा गिल सामनावीर ठरला.
अखेर 58 वर्षांनंतर विजयाचा श्रीगणेशा
हिंदुस्थानने इंग्लंडमधील सर्वच स्टेडियमवर एक का होईना विजय मिळवलेला आहे. अपवाद एकट्या एजबॅस्टनचा होता. या मैदानात 1967 सालापासून हिंदुस्थान कसोटी खेळतोय, पण या मैदानावर हिंदुस्थानला एकाही सामन्यात विजय मिळवता आला नव्हता. अनेकदा विजयाची संधी लाभली होती, पण ती अलगद निसटली. त्यामुळे एजबॅस्टनवरील पराभवाची मालिका खंडित करण्याचे आव्हान गिलपुढे होते आणि त्याने आपल्या विक्रमी आणि संस्मरणीय खेळीच्या जोरावर सहजगत्या पेलले. या विजयामुळे गेल्या 58 वर्षांतील पराभवांची मालिका खंडित करत हिंदुस्थानने एजबॅस्टनवर विजयारंभ करून दाखवला. हिंदुस्थानने नवव्या कसोटीत आपला पहिला विजय मिळवला.