
बंगालच्या उपसागरात अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडी आयएनएस अरिघाटवरून हिंदुस्थानने ३,५०० किमी पल्ल्याच्या K-4 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. याबाबत माहिती देताना हिंदुस्थानी नौदलाने गुरुवारी जाहीर केले की, मंगळवारी विशाखापट्टणमच्या किनाऱ्यावर ही चाचणी घेण्यात आली. हिंदुस्थान आता जमिनीवरून आणि हवेतून तसेच समुद्रातून अण्वस्त्रे डागण्यास सक्षम असेल.
हे क्षेपणास्त्र २ टनांपर्यंतचे अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम आहे. के-सिरीज क्षेपणास्त्रांमधील ‘के’ हे अक्षर हिंदुस्थानच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या सन्मानार्थ आहे.
दरम्यान, K-4 क्षेपणास्त्र हे जमिनीवरून प्रक्षेपित होणाऱ्या अग्नि मालिकेवर आधारित एक प्रगत प्रणालीचे क्षेपणास्त्र आहे, जे पाणबुडीतून प्रक्षेपणासाठी विकसित करण्यात आले आहे. प्रक्षेपणाच्या वेळी हे क्षेपणास्त्र आधी समुद्राच्या पृष्ठभागावर येते, त्यानंतर उड्डाण करून लक्ष्याकडे झेपावते. हे क्षेपणास्त्र न्यूक्लियर वॉरहेड वाहून नेण्यास सक्षम आहे आणि अरिहंत वर्गातील पाणबुड्यांमधून डागले जाऊ शकते.



























































