
हिंदुस्थानाचा संघ आयपीएल संपल्यानंतर इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. इंग्लंड दौऱ्यात दोन्ही उभय संघामध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेपूर्वी टीम इंडियाला दोन मोठे धक्के बसले. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला. यामुळे निवड समितीपुढे मजबूत संघ निवडण्याचे आव्हान आहे. अशातच टीम इंडियाचा माजी खेळाडू वसीम जाफर याने इंग्लंड दौऱ्यासाठी आपला संभाव्य संघ निवडला आहे.
इंग्लंड दौऱ्यात कर्णधारपदाची माळ युवा खेळाडू शुभमन गिल याच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे. मात्र वसीम जाफर याने टीम इंडियाचे नेतृत्व वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्याकडे दिले आहे. तर उप कर्णधारपद गिल याच्याकडे दिले आहे. वसीम जाफर याने या ठिकाणी अनुभवाला प्राधान्य दिल्याचे दिसते.
बुमराहने आतापर्यंत तीन कसोटीत टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे. हिंदुस्थानचा संघ 2022 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर गेला असता बुमराह याने एका कसोटीत टीम इंडियाचे नेतृत्व केले होते, तर याच वर्षी बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतही त्याने दोन कसोटीत टीम इंडियाचे नेतृत्व केले. यापैकी पर्थ येथील कसोटी सामना टीम इंडियाने जिंकला होता. तसेच हिंदुस्थानचा संघ आयर्लंड दौऱ्यावर असताना बुमराह याने टी20 फॉरमॅटमध्येही टीम इंडियाचे नेतृत्व केले होते.
वसीम जाफरने निवडलेला 16 सदस्यांचा संघ
यशस्वी जयस्वाल, के एल राहुल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर किंवा करूण नायर, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अभिमन्यू इश्वरन, ध्रुव जुरेल, सरफराज खान, अर्शदीप सिंग किंवा प्रसिध कृष्ण किंवा आकाशदीप सिंह, वॉशिंग्टन सुंदर