
इराण आणि इस्त्रायल यांच्यातील युद्धामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानच्या शेजारील दोन देशांनी मदतीसाठी आर्जव केले आहे. इराणमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुखरूप आणण्याची विनंती नेपाळ आणि श्रीलंकेने केली असून हिंदुस्थानने ऑपरेशन सिंधू मोहिमेचा विस्तार करत इराणमधून नेपाळी, श्रीलंकन नागरिकांना आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी दूतावासाकडून आपत्कालीन हेल्पलाईन जारी केली आहे.
हिंदुस्थानने इराणमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना सुरक्षित परत आणण्यासाठी ऑपरेशन सिंधू सुरू केले आहे. इराण आणि इस्त्रायलमधील युद्धामुळे वाढता तणाव पाहता शेजारील नेपाळ आणि श्रीलंका या दोन्ही देशांनी इराण येथून आपले अडकलेले नागरिक परत आणण्यासाठी सरकारला विनंती केली आहे. या विनंतीला प्रतिसाद देत इराणमधील हिंदुस्थानी दूतावासाने नेपाळ आणि श्रीलंकेच्या नागरिकांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी सकाळी विशेष विमानाने अष्गताबाद, तुर्कमेनिस्तान येथून हिंदुस्थानी नागरिकांना दिल्ली येथे आणण्यात आले. तर दूतावासाने तातडीचे संपर्क क्रमांक जारी केले असून टेलिग्रामद्वारेही संपर्क साधण्याचे आवाहन नेपाळ, श्रीलंका देशातील नागरिकांना केले आहे.
हिंदुस्थानच्या मोहिमेचे स्वागत
ऑपरेशन सिंधू अंतर्गत आतापर्यंत शेकडो हिंदुस्थानी नागरिकांना इराणमधून सुरक्षितपणे मायदेशी आणण्यात आले आहे. या मोहिमेच्या माध्यमातून नेपाळ आणि श्रीलंकेच्या नागरिकांनाही सुरक्षितपणे त्यांच्या देशात परत आणण्याचा प्रयत्न केला जाईल. हिंदुस्थानच्या या निर्णयाचे शेजारील देशांनी स्वागत केले आहे.