हिंदुस्थान जर्मनीकडून 70 हजार कोटी रुपयांना 6 पाणबुड्या खरेदी करणार, केंद्र सरकार इस्रायलकडून रॅम्पेज क्षेपणास्त्र देखील करणार खरेदी

केंद्र सरकारने हवाई दल आणि नौदलाची ताकद वाढवण्यासाठी दोन मोठे करार करण्यास सहमती दर्शविली आहे. पहिल्या करारात, संरक्षण मंत्रालय आणि माझगाव डॉकयार्ड्स लिमिटेड (MDL) जर्मनीकडून 6 पाणबुड्या खरेदी करणार आहेत. ‘प्रोजेक्ट 75 इंडिया’ अंतर्गत हिंदुस्थानात बनवल्या जाणाऱ्या या पाणबुड्यांच्या खरेदीसाठी वाटाघाटी सुरू करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. हा करार 70 हजार कोटींमध्ये होऊ शकतो.

तसेच केंद्र सरकार इस्रायली रॅम्पेज एअर-टू-ग्राउंड क्षेपणास्त्रांचा मोठा साठा खरेदी करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा आदेश लवकरच जलदगती प्रक्रियेअंतर्गत दिला जाईल. पाकिस्तानमधील मुरीदके आणि बहावलपूर येथील दहशतवादी मुख्यालयांवर अचूक हल्ल्यांमध्ये रॅम्पेज क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला होता.