
रोखीने व्यवहार आता जवळपास इतिहासजमा झाले असून आता जलद आणि सुरक्षित डिजिटल पेमेंटलाच प्रत्येक जण प्राधान्य देताना दिसतोय. डिजिटल पेमेंटमध्ये हिंदुस्थानने जगात पहिले स्थान पटकावल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अहवालातून समोर आले आहे. युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसमुळे हिंदुस्थानने डिजिटल व्यवहारांमध्ये बाजी मारली आहे.
2016 मध्ये नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने सुरू केलेले यूपीआय आज देशात आर्थिक व्यवहार करण्याचा सर्वात सोपा आणि लोकप्रिय मार्ग बनला आहे. यूपीआयच्या मदतीने नागरिक त्यांची अनेक बँक खाती एकाच मोबाईल अॅपशी लिंक करू शकतात आणि काही सेकंदांतच सुरक्षित व कमी किमतीचे व्यवहार करू शकतात. दरम्यान यूपीआय पेमेंटद्वारे दर महिन्याला 1 हजार 800 कोटींहून अधिक व्यवहार होत असल्याचे समोर आले आहे.
2024 मध्ये 24 लाख कोटींचा व्यवसाय
यूपीआयद्वारे जून 2024 मध्ये यूपीआयने 18.39 अब्ज व्यवहारांसह 24.03 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय केला. म्हणजेच गेल्या वर्षी जून 2023 मधील 13.88 अब्ज व्यवहारांच्या तुलनेत 2024 मध्ये झालेल्या आर्थिक व्यवहारांमध्ये 32 टक्क्यांची वाढ झाल्याचे समोर आले आहे.
हिंदुस्थानात 85 टक्के व्यवहार यूपीआयद्वारे
हिंदुस्थानातील 85 टक्के डिजिटल पेमेंट यूपीआयद्वारे होत आहेत. या व्यवहारांच्या माध्यमांतून 49.1 कोटी वापरकर्ते, 6.5 कोटी व्यावसायिक आणि 675 बँकांना एकाच व्यासपीठावर जोडते. इतकेच नाही तर यूपीआय आता जागतिक स्तरावरदेखील सुमारे 50 टक्के रिअल टाइम डिजिटल पेमेंट हाताळत असल्याचे दिसत आहे.