इंग्लिश दारू, कार आणि कपडे स्वस्त होणार; मोदींचा ब्रिटनमध्ये मुक्त व्यापार करार

India UK Free Trade Agreement

हिंदुस्थान आणि ब्रिटनमध्ये मुक्त व्यापाराचा ऐतिहासिक करार आज झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी व ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्या उपस्थितीत या करारावर सह्या करण्यात आल्या. या करारामुळे हिंदुस्थानची 99 टक्के निर्यात आता टॅक्स फ्री होणार आहे, तर इंग्लिश व्हिस्की, कार, कपडय़ांसह ब्रिटनची अनेक उत्पादने हिंदुस्थानींना स्वस्तात मिळणार आहेत.

गेल्या तीन वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये मुक्त व्यापार करारासाठी वाटाघाटी सुरू होत्या. या वाटाघाटींना आता यश आले आहे. मुक्त व्यापारामुळे द्विपक्षीय व्यापार वर्षाला 34 अब्ज डॉलरने वाढण्याची आशा आहे. फ्री ट्रेड अॅग्रीमेंटमुळे हिंदुस्थानची जवळपास 99 टक्के निर्यात ब्रिटनमध्ये करमुक्त असेल, तर ब्रिटनमधील अनेक उत्पादनांच्या आयातीवर हिंदुस्थानात लागणारा कर मोठय़ा प्रमाणात कमी होणार आहे. या सगळय़ाचा फायदा हिंदुस्थानी उद्योगांसह सर्वसामान्य जनतेलाही होणार आहे.

काय फायदा होणार?

वैद्यकीय उपकरणे, अवकाश संशोधन व हवाई उड्डाण क्षेत्रात लागणारी उत्पादने स्वस्तात मिळणार.

ब्रिटिश बनावटीच्या कार, शीतपेये, सौंदर्यप्रसाधने स्वस्तात मिळणार. या उत्पादनांवरील सरासरी 15 टक्के आयात कर 3 टक्क्यांवर येणार आहे.

ब्रिटिश बनावटीची व्हिस्की हिंदुस्थानात स्वस्त होणार आहे. मुक्त व्यापार करारामुळे व्हिस्कीवरील आयात कर सुरुवातीला 150 टक्क्यांवरून थेट 75 टक्क्यांवर येणार आहे, तर पुढच्या 10 वर्षांत 40 टक्क्यांवर येणार आहे.

हिंदुस्थानी नागरिकांना ब्रिटनमध्ये स्वस्तात राहता होणार. हिंदुस्थानी कंपन्या व फ्री लान्सर्सना यूकेतील 36 सेवा क्षेत्रात प्रवेश मिळणार.

ब्रिटनमध्ये कुठलेही कार्यालय न थाटता हिंदुस्थानी प्रोफेशनल्सना यूकेतील 35 क्षेत्रात 24 महिने काम करता येणार.