
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ धोरण जाहीर करत जगाला मोठा धक्का दिला होता. त्याचे जगभरात पडसाद उमटले. त्यानंतर ट्रम्प यांनी नरमाईचे धोरण घेत तीन महिन्यांसाठी स्थगिती दिली. ही मुदत आता 9 जुलैला संपत असून ट्रम्प आता काय भूमिका घेणार, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यात व्यापार कराराच्या अटींबाबत एक करार झाला आहे आणि तो 8 जुलै रोजी जाहीर केला जाऊ शकतो, अशी माहिती मिळाली होती. मात्र, अद्यापही व्यापार कराराबाबत सहमती झाली नसल्याचे स्पष्ट होत आहे.
हिंदुस्थान आणि अमेरिकेतील व्यापार कराराबद्दल मोठी बातमी आहे. दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत शुल्काबाबत कोणताही एकमत झालेली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अमेरिका 10 टक्के शुल्क कायम ठेवण्यास उत्सुक आहे तर हिंदुस्थानला अनेक क्षेत्रांसाठी लागू असलेले 10 टक्के शुल्क शून्य करावे असे वाटते.अशा परिस्थितीत दोन्ही देशांमधील मतभेद असून ते दूर करण्यासाठी हिंदुस्थानातील या कराराचे मुख्य वाटाघाटी करणारे राजेश अग्रवाल यांनी त्यांचा अमेरिका दौरा वाढवला आहे. त्यामुळे आता या प्रक्रियेला वेग आला आहे.
हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यात व्यापार कराराच्या अटींबाबत एक करार झाला आहे आणि तो 8 जुलै रोजी जाहीर केला जाऊ शकतो, असे वृत्त देण्यात आले होते. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील चांगल्या संबंधांचा हवाला देत सांगितले की दोघांमधील संबंध चांगले राहतील. हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करार अतिम टप्प्यात आहे आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प लवकरच त्याबद्दल माहिती देतील. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकरदेखील सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. ते अमेरिकेत होणाऱ्या क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होतील. त्यावेळी या करारावर सहमतीसाठी चर्चा होण्याची शक्यता आहे. अमेरिकेने हिंदुस्थानवर लादलेला 26 टक्के परस्पर शुल्क 9 जुलैपर्यंत स्थगित केला. मात्र, 10 टक्के बेसलाइन शुल्क हटवण्यात आले नाही. त्यामुळे आता ट्रम्प काय निर्णय घेणार, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.