क्रिकेटवारी – स्टोक्सने बॅझबॉलचा हट्ट सोडला!

>> संजय कऱ्हाडे

अखेर बेन स्टोक्सने बॅझबॉलचा नाद सोडला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अर्थात, ते योग्यच होतं. प्रथम फलंदाजी करा. बोर्डावर मोठय़ा धावा लावा, प्रतिस्पर्ध्यांना मैदानावर जास्तीत जास्त वेळ ठेवा, त्यांना थकवा, दडपणाखाली आणा अन् सामन्यावर हुकमत गाजवा! कसोटी क्रिकेटचा हा सोप्पा हिशेब. एजबॅस्टनला त्याने बॅझबॉलचा हट्ट केला होता आणि पराभवाबरोबर टीकेचाही तो धनी झाला होता.

लॉर्ड्सची खेळपट्टी वेगवान वगैरे नाही. पण फटकेबाजी करण्यासाठी हिरवा कंदील दाखवत नाहीये. मैदानसुद्धा सुपरफास्ट नाही. त्यामुळे इंग्लंडच्या फलकावर शंभरी लागली ती छतिसाव्या षटकांत. क्रिकेटचा खेळ कसा गमतीशीर असतो बघा. जो बुमरा विश्रांतीनंतर येईल, आपला करिश्मा दाखवील असं वाटलं; जो सिराज दुसऱया कसोटीत बुमराशिवाय डेनिस लिली वाटला आणि ज्या आकाश दीपने दुसऱया कसोटी सामन्यात दहा बळी घेऊन आमच्या अपेक्षा ‘द शार्ड’वर नेऊन ठेवल्या त्या सर्वांना मागे टापून पुढे आला तो नितीशपुमार रेड्डी! आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याला फार तर मध्यमगती गोलंदाज म्हणता येईल. चेंडू स्विंग करू शकणारा तो काही इयान बॉथमही नाही. पण त्याने आपल्या पहिल्याच षटकात दोन्ही इंग्लिश सलामीवीरांना बाद केलं! आशा पालवल्या.

चहापानाच्या आधी जाडेजाचा चेंडू फिरताना दिसला आणि चहापानानंतर पहिल्याच चेंडूवर जाडेजाने रुटला साथ देणाऱया पोपला जुरेलकडे झेल द्यायला भाग पाडलं. पंतला दुखापत झाल्यामुळे ध्रुव जुरेलने यष्टिरक्षण केलं. पंतची दुखापत फार गंभीर नसावी अशी अपेक्षा.

ज्यो रूट शतक झळकावण्याच्याच मनःस्थितीत दिसला. अर्धशतक पूर्ण करण्यासाठी त्याने तब्बल शंभर चेंडू घेतले. पुठलाही धोका पत्करणं त्याने टाळलं. दरम्यान, हिंदुस्थानविरुद्ध तीन हजार धावा नोंदवण्याचा पराक्रमही त्याने केला. रूट मोठा फलंदाज आहे. तो धडाकेबाज ब्रुकच्या बरोबरीने अनोखे नजारे दाखवणार असं वाटत असतानाच प्रसिधला बाजूला सारून संघात परतलेल्या बुमराने धडाकेबाज ब्रुकच्या काठय़ा वाजवल्या! 4 बाद 188.

लॉर्ड्सवर बॅझबॉलची आक्रमकता गायब, इंग्लंडच्या आघाडीवीरांची कसोटी क्रिकेटच्या शैलीत फलंदाजी

आता फलंदाजी करताना स्टोक्स आणखी कुठले हट्ट करणं सोडतो त्यावर बरंच अवलंबून असेल. जाता-जाता आपल्या माहितीसाठी. ‘द शार्ड लंडन ब्रिज’ म्हणजे जुना लंडन ब्रिज टॉवर. पुनर्निर्माणानंतर बहात्तर मजली शार्ड ही इंग्लंडमधली आजची सर्वात उंच (309.6 मीटर) इमारत आहे!