
क्रिकेटच्या पंढरीतही बॅझबॉलविरुद्धचा लढा बुलंद करण्यासाठी हिंदुस्थानी गिलसेनेचे वारकरी पुन्हा सज्ज झाले आहेत. एजबॅस्टनवर इतिहास घडवल्यानंतर आता हिंदुस्थानी संघाने विजयाच्या ध्येयानेच खेळायचे ठरवलेय. आता थांबायचं नाही, फक्त लढायचं आणि जिंकायचं. त्यामुळे लॉर्ड्सवरही इतिहासाची पुनरावृत्ती पाहाण्याचे वेध तमाम हिंदुस्थानी चाहत्यांना लागलेय.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीतही हिंदुस्थान सरसच होता. फक्त इंग्लंडच्या बॅझबॉलने बाजी मारली. इंग्लंडने हिंदुस्थानचे 371 धावांचे जबरदस्त आव्हान तुफानी फटकेबाजीने साकारले. इंग्लंडच्या झंझावातापुढे बुमराच काय पुणाचाच निभाव लागला नव्हता. लीड्सवर आघाडीवर असूनही हिंदुस्थान मालिकेत 1-0 असा पिछाडीवर पडला. एजबॅस्टनला तर हिंदुस्थान बुमराशिवाय ‘शोले’च्या ठापूरसारखा वाटत होता. पण लोहा लोहे को काटता है. हिंदुस्थानने आपल्या गोलंदाजांना ‘आपण हे करू शकतो’ असे विश्वासाचे बळ दिले. त्यानंतर गोलंदाज आकाश दीप आणि मोहम्मद सिराजने इतिहास घडवला. बॅझबॉलला ठोपून काढण्याचे काम शुभमन गिलच्या बॅटने रोखठोक केले. त्यामुळे जी भीती एजबॅस्टनला होती, ती लॉर्ड्सवर किंचितही नाहीय. उलट इंग्लंडचा संघ काहीसा घाबरलाय. काहीसा सावधही झालाय. हिंदुस्थानलाही सावध होऊनच त्यांना उत्तर द्यावे लागेल.
हिंदुस्थानी संघाचा सस्पेन्स कायम
इंग्लंड कसोटीच्या आदल्या दिवशीच आपला संघ जाहीर करून आपला आत्मविश्वास दाखवतोय. मात्र हिंदुस्थानी संघाने आपल्या संघाच्या सस्पेन्सची परंपरा लॉर्ड्सवरही कायम ठेवलीय. एखाद्या सस्पेन्स-थ्रिलर सिनेमाप्रमाणे खुनी कोण आहे हे सांगणे कठीण आहे. तसेच हिंदुस्थानच्या अंतिम अकरा खेळाडूंची नावे आहेत. जसप्रीत बुमरा खेळतोय. हिंदुस्थानची ताकद दुप्पट झालीय. पण त्याच्या सोबतीला चौथा गोलंदाज कोण असेल, याचं उत्तर पुणालाच ठाऊक नाहीय. आकाश दीप खेळणार, मोहम्मद सिराजही असेल. गेल्या दौऱयात लॉर्ड्सवर त्यानेच इंग्लंडला देव दाखवले होते. त्यामुळे प्रसिध जाणार की त्याच्या जागी अर्शदीपला पदार्पणाची संधी दिली जाणार? की अपयशी ठरलेल्या नितीशला आणखी एक संधी दिली जाणार? की रवींद्र जाडेजासह पुन्हा वॉशिंग्टन सुंदरला लॉटरी लागणार? काहीही नक्की दिसत नाहीय. कोणतेही अंदाज पह्ल ठरू शकतात. त्यामुळे टॉसच्या आधीच हा सस्पेन्स जगजाहीर होईल, हे स्पष्ट आहे.
लॉर्ड्सवरही विक्रमांची बरसात
गेल्या दोन्ही कसोटी सामन्यांत फलंदाजांनी अनेक विक्रमांची बरसात केलीय. मग तो शुभमन गिल असो किंवा ऋषभ पंत. इंग्लंडकडून हॅरी ब्रुक आणि जॅमी स्मिथनेही झंझावाती फलंदाजी करत आपलाही खेळ दाखवून दिलाय. लॉर्ड्सवरही अनेक विक्रम होण्याच्या मार्गावर आहेत. कर्णधार शुभमन गिलने दोन कसोटींत तीन शतकांसह 585 धावा केल्या आहेत. त्याला सुनील गावसकरांचा कसोटी मालिकेतील सर्वाधिक 774 धावांचा विक्रम मोडण्याची संधी आहे. तसेच सलग तीन कसोटींत सलग शतके झळकवण्याच्याही विक्रमासमीप गिल आहे. वेगवान गोलंदाजांसमोर लॉर्ड्सवर कोणत्या फलंदाजाची फटकेबाजी पाहायला मिळतेय, याकडे साऱयांचे लक्ष आहे. तसेच गेल्या दोन कसोटींत 11 शतकांची मेजवानी मिळालीय. तिसऱया कसोटीत त्यात आणखी किती भर पडतेय, याबाबतही उत्सुकता कायम आहे.
आजपासून इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीला प्रारंभ, फक्त एकच बदल
इंग्लंडने पुन्हा एकदा आपला बॅझबॉल जोश दाखवलाय. जो डर गया, समजो मर गया. ते एजबॅस्टनच्या पराभवाने काहीसे चिंतीत असले तरी त्यांनी आपल्या संघात फक्त एकच बदल केलाय. पराभवाने आपल्या बॅझबॉल शैलीत काहीही फरक पडलेला नाहीय, अशीच देहबोली दाखवलीय. त्यांनी क्रॉवलीलाही संघात ठेवलेय आणि व्होक्सवरही विश्वास दाखवलाय. जोफ्रा आर्चरला त्यांनी अंतिम संघात घेतलेय. वेगवान गोलंदाजांचं माहेरघर असलेल्या लॉर्ड्सवर ते चार वेगवान गोलंदाजांसहच खेळणार आहेत.
लॉर्ड्स कसोटीसाठी संभाव्य संघ
इंग्लंडचा अंतिम संघ – झॅक क्रॉवली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रुक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टिरक्षक), जोफ्रा आर्चर, ब्रायडन कार्स, ख्रिस व्होक्स, शोएब बशीर.
हिंदुस्थानचा संभाव्य संघ – यशस्वी जैसवाल, के. एल. राहुल, साई सुदर्शन/करुण नायर/अभिमन्यू ईश्वरन, शुभमन गिल, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, वॉशिंग्टन सुंदर/शार्दुल ठापूर, आकाश दीप, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज.