
मालिका कुणाची? हा फैसला लावण्यासाठी यजमान हिंदुस्थान आणि न्यूझीलंड होळकर मैदानावर उतरणार आहेत. पहिल्या दोन सामन्यांत फिरकी गोलंदाजी सपशेल अपयशी ठरली असून किवी फलंदाजांनी हिंदुस्थानच्या रणनीतीला अक्षरशः चिरडून टाकलेय. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसर्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यापूर्वी हिंदुस्थानी संघासमोर त्यांचे खडतर आव्हान उभे राहिले आहे. धोक्याची घंटा वाजली आहे. त्यामुळे होळकर स्टेडियमवर खेळल्या जाणाऱया निर्णायक सामन्यापूर्वी हिंदुस्थानी संघ व्यवस्थापनाला धाडसी निर्णय घ्यावे लागणार आहेत.
राजकोटमधील पराभवाने हिंदुस्थानी संघाचे डोळे उघडले आहेत. मधल्या षटकांत हिंदुस्थानचा गोलंदाजी कणा मोडला होता. कुलदीप यादवचे अपयश संघासाठी फारच धोकादायक ठरले आहे. त्याच्या गोलंदाजीत ना नियंत्रण होती ना धार. त्याचा थेट फायदा डॅरिल मिचेलने घेतला. मिचेलने कुलदीपच्या प्रत्येक चेंडूवर आत्मविश्वासाने हल्ला चढवत शतक झळकावले आणि हिंदुस्थानची फिरकी रणनिती उद्ध्वस्त केली.
किवी फलंदाजांनी स्वीप शॉट्स आणि अचूक टायमिंगच्या जोरावर फिरकीला निष्प्रभ केले. हिंदुस्थानी गोलंदाज दबाव निर्माण करण्यात अपयशी ठरले, तर दुसरीकडे न्यूझीलंडच्या फिरकीने हिंदुस्थानी फलंदाजांची काsंडी केली. ही तफावतच सामन्याचा निकाल ठरवणारी ठरली.
आता इंदूरचे होळकर मैदान हे लहान सीमारेषा, फलंदाजांसाठी स्वर्ग आणि गोलंदाजांसाठी खडतर परीक्षा ठरण्याची शक्यता आहे. येथे प्रयोग नव्हे, तर शिस्त आवश्यक आहे. गोलंदाजांनी स्टंप्सवर मारा करत प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांवर अंकुश ठेवायला हवा. अन्यथा प्रत्येक चूक थेट षटकारात बदलू शकते.
वॉशिंग्टन सुंदरच्या अनुपस्थितीने संघ संतुलन बिघडले आहे. नितीश कुमार रेड्डी प्रभाव पाडू शकले नाहीय. त्यामुळे आयुष बदोनीसारख्या ऑफस्पिनरचा विचार होऊ शकतो. संघ अतिरिक्त वेगवान गोलंदाज घेण्याच्या दिशेनेही वळू शकतो. अर्शदीप सिंगला संधी मिळते का, हे निर्णायक ठरेल. त्याची फुल लेंथ होळकरवर घातक ठरू शकते. मोहम्मद सिराज आक्रमणाची धुरा सांभाळणार असून अंतिम संयोजन रवींद्र जाडेजाभोवती फिरणार आहे.
फलंदाजी मात्र बदलाच्या पलीकडे आहे. शुभमन गिल, रोहित शर्मा, विराट कोहली, के. एल. राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्यावरच सर्व जबाबदारी असेल. होळकरवर हिंदुस्थानचा विक्रम दमदार आहे. सलग पाच विजय मिळवलेत. त्यामुळे होळकरचे मैदान हिंदुस्थानसाठी खेळकर ठरेल, असा विश्वास आहे. आता हा सामना नाही, युद्ध आहे! बदल केला तर संधी, चूक केली तर मालिका हातातून निसटण्याची भीती. त्यामुळे रविवारची दुपार हिंदुस्थानची खरी परीक्षा घेणार.






























































