
मंगोलियाच्या रिंगमध्ये हिंदुस्थानच्या महिला मुष्टियोद्ध्यांनी अक्षरशः वर्चस्व गाजवत सुवर्णाचा पाऊस पाडला. मीनाक्षी हुड्डा आणि प्रीती पवार यांच्या नेतृत्वाखाली चार खेळाडूंनी अंतिम फेरी जिंकत चार सुवर्ण पदकांवर झडप घातली. या कामगिरीमुळे महिलांनी चार सुवर्णांसह दहा पदकांची कमाई करत आपला दबदबा अवघ्या जगाला दाखवून दिला आहे. हिंदुस्थानच्या महिला 4 सुवर्णांसह 16 पदकांसह पदक तालिकेत नंबर वनला पोहोचल्या आहेत.
आजचा दिवस हिंदुस्थानी महिला मुष्टियोद्ध्यांसाठी सोन्याचा ठरला. 48 किलो गटात मीनाक्षीने मंगोलियाच्या प्रतिस्पर्धीला 5-0 ने नामोहरम करत दिवसाची दमदार सुरुवात केली. त्यानंतर प्रीतीने तीन वेळा विश्वविजेती आणि ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या खेळाडूवर 5-0 अशी एकतर्फी मात करत आपले सोने नक्की केले. प्रिया घंघासने उत्तर कोरियाच्या प्रतिस्पर्धीला 3-0 ने हरवत विजयाची परंपरा कायम ठेवली, तर अरुंधती चौधरीने 4-1 ने विजय मिळवत सुवर्ण चौकार पूर्ण केला.
मात्र 57 किलो गटात हिंदुस्थानला मोठा धक्का बसला. जॅस्मीन लंबोरियाला थायलंडच्या बलाढ्य प्रतिस्पर्धीकडून 0-5 असा पराभव पत्करावा लागला. अल्फिया पठाणलाही अंतिम सामन्यात पराभव झाल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
एकूण कामगिरीत हिंदुस्थानने चार सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्य अशी दहा पदकांची कमाई करत आपली ताकद दाखवली. काही गटांत कमी स्पर्धक असल्याने काही खेळाडूंना थेट पदकही मिळाले. याआधी निकहत जरीन, लवलीना बोरगोहेन आणि पूजा रानी यांना उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला.
हिंदुस्थानला सर्वाधिक पदके
या स्पर्धेत हिंदुस्थानने एकूण 16 पदके निश्चित करत सहभागी देशांमध्ये सर्वाधिक पदके जिंकण्याचा मान मिळवला आहे. आता स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी पुरुष गटातील दोन हिंदुस्थानी बॉक्सर अंतिम फेरीत उतरून हिंदुस्थानच्या यशात आणखी भर घालण्याचा प्रयत्न करतील.

























































