
लागोपाठच्या दोन मोठ्या विजयाने मनोबल उंचावलेला हिंदुस्थानी महिला संघ उद्या (दि. 26) विजयाच्या हॅट्ट्रिकसह मालिका जिंकण्याच्या निर्धाराने मैदानावर उतरणार आहे. दुसरीकडे या पाच सामन्यांच्या टी-20 क्रिकेट मालिकेतील आव्हान राखण्यासाठी आता श्रीलंकेच्या महिला संघाला जिंकावेच लागणार आहे.
भेदक गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेला कमी धावसंख्येपर्यंत रोखल्यानंतर हिंदुस्थानच्या आघाडीच्या फळीने लक्ष्य सहज गाठले. पहिल्या टी-20 मध्ये क्षेत्ररक्षणात झालेल्या काही चुका दुसऱया सामन्यात सुधारत हिंदुस्थानने पाहुण्या श्रीलंकेला फारशी संधी दिली नाही. श्रीलंकेसाठी मात्र ही मालिका कठीण ठरली आहे. काही फलंदाजांनी सुरुवात चांगली केली, पण आक्रमकतेचा अभाव स्पष्ट दिसून आला आणि त्यामुळे संघाला 130 पेक्षा कमी धावांवर समाधान मानावे लागले. गोलंदाजांनाही खेळपट्टीकडून फारशी मदत मिळाली नाही, त्यात दवाचाही फटका बसला. संघात अनेक बदल करत नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली असून ही मालिका श्रीलंकेसाठी संक्रमणाचा टप्पा दर्शवते. पुढील वर्षी 12 जूनपासून सुरू होणाऱया टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर नवोदित खेळाडूंवर स्वतःला सिद्ध करण्याची जबाबदारी आहे.
हिंदुस्थानकडून नवोदित वैष्णवी शर्माने चांगली छाप पाडली असून दुसऱया टी-20 मध्ये तिने चार षटकांत 32 धावांत 2 बळी घेतले. मालिकेच्या उर्वरित सामन्यांत जी. कमलिनी या नव्या खेळाडूला पदार्पणाची संधी मिळू शकते.
आता मालिका तिरुवनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. या मैदानावर हिंदुस्थानने याआधी कोणत्याही फॉरमॅटमध्ये सामना खेळलेला नाही. मात्र सध्या यजमानांचा आत्मविश्वास शिखरावर असून मालिकेतील आणखी एक विजय मिळवून पाच सामन्यांची मालिका खिशात घालण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
हिंदुस्थानचा संभाव्य संघ ः स्मृती मानधना, शफाली वर्मा, जेमिमा, रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (यष्टिरक्षक), स्नेह राणा / दीप्ती शर्मा, अमनजोत कौर, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, वैष्णवी शर्मा, एन. श्री चरनी.
श्रीलंकेचा संभाव्य संघ ः चमारी अटापटू (कर्णधार), विश्मी गुणरत्ने, हसीनी परेरा, हर्षिता समरविक्रमा, नीलाक्षिका सिल्वा, कौशिनी नुथ्यंगना (यष्टिरक्षक), कविशा दिलहारी, माल्की मदारा, इनोका रणवीरा, काव्या काविंदी, शशिनी गिम्हानी.





























































