
हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघाला तब्बल दोन दशकानंतर (20 वर्षे) कसोटी क्रिकेटमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. पर्थ येथील वॅका मैदानावर झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने कर्णधार एलिसा हिलीच्या शेवटच्या कसोटी सामन्यात हिंदुस्थानवर 10 विकेट्सनी विजय मिळवला. हिंदुस्थानला यापूर्वी 18 फेब्रुवारी 2006 रोजी ऍडलेड येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतरच्या 20 वर्षांत हिंदुस्थानी महिलांनी 9 कसोटी सामने खेळले होते. त्यापैकी 6 जिंकले, तर 3 सामने अनिर्णित राहिले होते.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी अवघ्या 25 धावांचे लक्ष्य मिळाले होते. हे लक्ष्य त्यांनी 4.3 षटकांत कोणतीही विकेट न गमावता सहज गाठले. जॉर्जिया वॉल 16 आणि फोबी लीचफिल्ड 11 धावांवर नाबाद राहिल्या.
तिसऱ्या दिवशी हिंदुस्थानी संघाने 105 धावांपासून पुढे खेळ सुरू केला, मात्र संपूर्ण संघ 149 धावांत बाद झाला. त्याआधी ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 323 धावा केल्या होत्या, तर हिंदुस्थानचा पहिला डाव 198 धावांत आटोपला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 125 धावांची आघाडी मिळाली.


























































