
ऍडलेड कसोटीपूर्वी हिंदुस्थानी संघ आघाडीवर होता, पण तिथे चित्र पालटल्यावर आता गॅबावर आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघात काँटे की टक्कर होणार यात कुणालाही शंका नसावी. पर्थमध्ये आघाडीवर असलेला हिंदुस्थान आता पिछाडीवर पडलाय, तर दुसरीकडे यजमानांनी जोरदार मुसंडी मारलीय. दुसरी कसोटी जिंकणारा संघच मालिका जिंकणार, असे संकेत क्रिकेटपंडितांनी दिलेत. त्यामुळे गॅबावर ताबा मिळवण्यासाठी यजमान आणि पाहुणे दोघेही सज्ज आहेत. जो जिंकणार तोच मालिकेत टिकणार हेच सूत्र आहे.
एकीकडे हिंदुस्थानकडे गेल्या पराभवाची भळभळती जखम आहे, तर दुसरीकडे गेल्या मालिकेत गॅबावर मिळवलेल्या थरारक विजयाच्या आठवणी. त्या संस्मरणीय आठवणींच्या जोरावर हिंदुस्थान मालिकेत पुनरागमनासाठी झुंजणार आहे. दुसऱया कसोटीत हिंदुस्थानचा अवघ्या सव्वादोन दिवसांतच फडशा पाडल्यामुळे संघाचे मनोधैर्य निश्चितच खचले होते. मात्र पराभवाचे सारे दुःख विसरून हिंदुस्थानने गॅबा जिंकण्याचेच ध्येय डोळय़ांपुढे ठेवलेय. हे ध्येय सोपे नसले तरी हिंदुस्थानी संघ ते साध्य करण्यासाठी सर्वस्व पणाला लावून उतरणार आहे.
गिल, पंतच्या खेळावर सर्वांच्या नजरा
2021च्या हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियन दौऱयात गॅबावर थरारक विजय मिळवत मालिकेत आघाडी घेतली होती आणि नंतर मालिकाही जिंकली. हिंदुस्थानी संघ या पराक्रमाची पुनरावृत्ती करण्यासाठी उत्सुक आहे. गेल्या ऑस्ट्रेलियन दौऱयात गॅबावर खेळण्यापूर्वी दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते आणि गॅबावर कसोटी सुरू झाली आणि सारा माहोलच बदलला. अत्यंत संघर्षपूर्ण झालेल्या या कसोटीत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 294 धावा करून हिंदुस्थानसमोर 328 धावांचे जबर आव्हान दिले होते आणि हिंदुस्थानने शुभमन गिलच्या 91 आणि ऋषभ पंतच्या जिगरबाज 89 धावांच्या खेळीच्या जोरावर ते लक्ष्य गाठले. त्या स्फूर्तिदायक विजयाची आठवण पुन्हा ताजी झालीय. हिंदुस्थानी विजयाचे शिल्पकार पुन्हा त्याच मैदानावर उतरणार आहेत. त्यामुळे या दोघांच्या खेळावर सर्वांचे लक्ष लागलेय.
हेझलवूड आला रे…
दुसऱ्या कसोटीत दुखापतीचे कारण देत जॉश हेझलवूडला वगळण्यात आले होते. तेव्हा हेझलवूड पूर्ण मालिकेतून बाहेर गेल्याची भीती वर्तवण्यात आली होती. मात्र तो पुन्हा एकदा संघात असेल अशी दाट शक्यता आहे. त्याच्या गोलंदाजी संघात आलेल्या स्कॉट बोलॅण्डला बसवले जाणार आहे. या बदलाव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियन संघ तोच असेल.
पुन्हा सुंदर संघात
हिंदुस्थानचा सर्वाधिक विकेट टिपणारा वर्तमान फिरकीवीर अश्विनला पुन्हा संघाबाहेर जावे लागणार आहे आणि त्याची जागा वॉशिंग्टन सुंदर घेणार असल्याचे जवळजवळ निश्चित आहे. त्यामुळे रवींद्र जाडेजाची संघप्रवेशाची प्रतीक्षा अजून वाढणार आहे. दुसरीकडे हर्षित राणाऐवजी आकाश दीपच्या चेंडूंना गॅबावर पडायची संधी मिळणार आहे. हे दोन बदल संघात अपेक्षित मानले जात आहेत.
आता तरी देवा पावशील का?
रोहित शर्माचे सध्या वाईट दिवस सुरू आहेत. सलग चार कसोटींत हिंदुस्थान त्याच्या नेतृत्वाखाली हरलाय. एवढेच नव्हे तर, एक फलंदाज म्हणूनही तो पूर्णपणे अपयशी ठरलाय. या निराशाजनक कामगिरीनंतर रोहितवर टीकेचे बाण सुटणारच. पण गॅबावर त्याच्या बॅटीतून धावा निघाल्या नाहीत तर त्यावर टीकाकारांपासून दूर धावण्याची पाळी येऊ शकते. रोहितनेही आपल्या बॅटनेच टीकाकारांना चोख प्रत्युत्तर देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे तो मधल्या फळीत येऊन धावांचा झंझावात पेश करील, याची सारे चाहते आवर्जून वाट पाहताहेत.
ब्रिस्बेन कसोटीसाठी संभाव्य संघ
हिंदुस्थान ः केएल राहुल, यशस्वी जैसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, रोहित शर्मा (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, नितीश रेड्डी, आकाश दीप, जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज
ऑस्ट्रेलिया ः नॅथन मॅकस्विनी, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रव्हिस हेड, मिचेल मार्श, ऍलेक्स कॅरी (यष्टिरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लायन, जॉश हेझलवूड.
थेट प्रक्षेपण ः सकाळी 5.50 पासून