लष्कराची ताकद आणखी वाढली, हिंदुस्थानला मिळाले तीन अपाचे हेलिकॉप्टर

हिंदुस्थानी लष्कराची ताकद आणखी वाढली आहे. अमेरिकेने मंगळवारी तीन ‘एएच- 64 ई’ अपाचे हेलिकॉप्टर हिंदुस्थानी लष्कराला सुपूर्द केले. हे हेलिकॉप्टर्स जगातील सर्वात शक्तिशाली अटॅक हेलिकॉप्टर्सपैकी एक आहेत. याआधी तीन अपाचे हेलिकॉप्टर अमेरिकेने दिलेले आहेत.  शेवटच्या तुकडीतील हे तीनही हेलिकॉप्टर्स जोधपूरमध्ये तैनात केले जातील.

 हिंदुस्थानी सैन्यासाठी सहा अपाचे हेलिकॉप्टर्सचा सुमारे 5 हजार 691 कोटी रुपयांचा करार आहे. हा करार फेब्रुवारी 2020 मध्ये अमेरिकेसोबत करण्यात आला होता. ही सर्व हेलिकॉप्टर्स 2024 पर्यंत हिंदुस्थानात येणे अपेक्षित होते. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे विलंब झाला. या हॅलिकॉप्टरची पहिली बॅच (तीन हेलिकॉप्टर्स) जुलै 2025 मध्ये अमेरिकेच्या वाहतूक विमानाने हिंडन एअरबेसवर पोहोचली होती. आता उर्वरित तीन अपाचे हेलिकॉप्टर्सही मिळाली आहेत.

अपाचेमधील मॉडर्न इलेक्ट्रॉनिक्स सिस्टममुळे अपाचे ‘एएच- 64 ई’ जगातील सर्वात प्रगत लढाऊ हेलिकॉप्टर मानले जाते. अमेरिकेने 1991 मध्ये आखाती युद्धादरम्यान इराकविरोधात आणि अफगानिस्तानमधील तालिबानविरोधातील युद्धात वापर केला. आता हिंदुस्थान अपाचे वापरणारा जगातील 14 वा देश आहे.

एक मिनिटात 600 गोळ्या सुटणार

अपाचे हेलिकॉप्टर हे 16 फूट उंच आणि 18 फूट रुंद आहे. यामध्ये हेलफायर क्षेपणास्त्रs, 70 मिमी रॉकेट आणि 30 मिमी चेन गन आहे. या चेन गनमधून एक मिनिटाला 600 ते 650 गोळ्या झाडण्याची क्षमता आहे. हे हॅलिकॉप्टर अंधारातही शत्रूला नेस्तनाबूत करण्यास सक्षम आहेत.