पहलगाम हल्ल्यातील गुन्हेगारांना एक चूक महागात पडली अन्…, वाचा ‘ऑपरेशन महादेव’ची इनसाईड स्टोरी

पहलगाम हल्ल्यानंतर तब्बल 96 दिवसांनी ऑपरेशन महादेव रावबत लष्कराने पहलगाम हल्ल्यातील गुन्हेगारांचा खात्मा केला. ऑपरेशन महादेव अंतर्गत श्रीनगरजवळील दाचीगामच्या जंगलात मारल्या गेलेल्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. दहशतवाद्यांच्या ताब्यातून जप्त केलेल्या शस्त्रांच्या फॉरेन्सिक तपासणीत हे सिद्ध झाले आहे. सुरक्षा दलांनी तीन महिन्यांनंतर पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा केला. लष्कराने कसे राबवले ऑपरेशन महादेव? जाणून घेऊया इनसाईड स्टोरी.

अधिकृत माहितीनुसार, दहशतवाद्यांनी दाचीगाम राष्ट्रीय उद्यानाच्या महादेव टेकडीवर शनिवारी 26 जुलै रोजी त्यांचा सॅटेलाइट फोन चालू केला होता. हा फोन चालू होताच, सुरक्षा दल सतर्क झाले. तेव्हापासून गुप्तचर संस्था आणि सुरक्षा दल जंगलात दहशतवाद्यांचा शोध घेत होते. लष्कराच्या पॅरा-एसएफ (विशेष दल) ला मोहिमेसाठी जंगलात पाठवण्यात आले होते.

ऑपरेशन महादेवसाठी पहलगाम आणि दाचीगाममधील जंगले आणि पर्वतांमध्ये थर्मल इमेजिंग ड्रोन, सॅटेलाइट ट्रॅकिंग, सिग्नल इंटरसेप्शन आणि गुप्तचर यंत्रणांचा वापर केला जात होता. अखेर 48 तासांच्या शोधमोहिमेनंतर, 4 पॅरा-एसएफ युनिट्सचे कमांडो लिडवास आणि महादेव टेकड्यांजवळ दहशतवाद्यांच्या छावणीजवळ पोहोचले.

महादेव टेकड्यांजवळ मंगळवारी सुमारे सहा तास चाललेल्या चकमकीत पहलगाम हल्ल्यातील तीन दहशतवाद्यांना ठार केले. घटनास्थळाहून सुरक्षा दलांनी शस्त्रे आणि दारूगोळा तसेच शनिवारी वापरलेला सॅटेलाइट फोन जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तो एक चिनी सॅटेलाइट फोन होता, ज्याचा वापर दहशतवादी सीमेपलीकडे (पाकिस्तान) त्यांच्या मालकांना संदेश पाठवण्यासाठी करत होते.

मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. सुलेमान शाह, जिब्रान भाई आणि अबू हमजा उर्फ हमजा अफगाणी अशी ठार केलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. हे तिघेही पाकिस्तानी नागरिक आहेत. हिंदुस्थानी लष्कराच्या चिनार कॉर्प्सच्या मते, पॅरा-एसएफ युनिट व्यतिरिक्त, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफ देखील या ऑपरेशनमध्ये सहभागी होते.

दहशतवाद्यांच्या ताब्यातून दोन एके-47 रायफल आणि एक एम-4 रायफल व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात हँडग्रेनेड, मॅगझिन आणि इतर युद्धसामग्री जप्त करण्यात आली आहे. दहशतवादी ज्या पॉलिथिन तंबूत लपले होते त्यातून अन्नपदार्थ आणि प्लेट्स इत्यादी भांडी देखील जप्त करण्यात आली आहेत.