नेपाळमधील बस दुर्घटनेत महाराष्ट्रातील काही भाविकांचा मृत्यू, राज्य सरकारची माहिती

नेपाळच्या तनहून जिल्ह्यामध्ये शुक्रवारी सकाळी भीषण अपघात झाला. हिंदुस्थानी प्रवाशांना घेऊन निघालेली एक बस मर्श्यांगडी नदीमध्ये कोसळली. या बस दुर्घटनेमध्ये 14 जणांचा मृत्यू झाला असून यातील काही जण महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती राज्य सरकारने दिली.

पोखराहून नेपाळची राजधानी काठमांडूच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या बसचा (क्र. यूपीएफटी 7623) तनहून जिल्ह्यात अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटून बस थेट दीडशे फूट खोल नदीमध्ये कोसळली. या बसमध्ये 40हून अधिक प्रवासी होते. यातील 14 जणांचा मृत्यू झाला, तर 16 हून अधिक जखमी झाले आहेत. या अपघातानंतर हिंदुस्थानी दूतावासाने +977-9851107021 हा आपत्कालिन नंबर जारी केला आहे.

राज्य सरकारने दिली माहिती

दरम्यान, नेपाळमध्ये बस दरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत महाराष्ट्रातील काही भाविकांचा मृत्यू झाला आहे. हे भाविक जळगाव जिल्ह्यातील आहेत, अशी माहिती राज्य सरकारने दिली.