
हिंदुस्थानी वंशाच्या कृशांगी मेश्रामने नुकतीच एक मोठी कामगिरी केली आहे. वयाच्या अवघ्या २१ वर्षी ती इंग्लंड आणि वेल्समधील सर्वात तरुण सॉलिसिटर (वकील) बनली आहे. तिच्या या यशाने अनेक तरुणांसाठी एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
पश्चिम बंगालमध्ये जन्मलेल्या आणि वाढलेल्या कृशांगीने सध्या संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये राहूनच हे यश संपादन केले आहे. तिने वयाच्या केवळ १५ व्या वर्षी द ओपन युनिव्हर्सिटी मधून कायद्याच्या शिक्षणाची सुरुवात केली. तिच्या कठोर परिश्रमामुळे अवघ्या तीन वर्षांत, म्हणजे १८ व्या वर्षी, तिने ‘फर्स्ट क्लास ऑनर्स लॉ डिग्री’ मिळवली. या पदवीने ती तिच्या विद्यापीठातील सर्वात कमी वयाची पदवीधर ठरली.
आपल्या यशाबद्दल बोलताना कृशांगीने द ओपन युनिव्हर्सिटीचे आभार मानले. ‘या विद्यापीठाने मला १५ व्या वर्षीच कायद्याचा अभ्यास करण्याची संधी दिली, ज्यामुळे माझ्या कायदेविषयक करिअरचा पाया मजबूत झाला आणि या क्षेत्रातील माझी आवडही वाढली,’ असे ती म्हणाली.
२०२२ मध्ये, कृशांगीला एका आंतरराष्ट्रीय कायदा फर्ममध्ये काम करण्याची संधी मिळाली. या काळात तिने हार्वर्ड ऑनलाइनवर जागतिक स्तराचे अभ्यासक्रम पूर्ण केले, तसेच सिंगापूरमध्ये व्यावसायिक अनुभवही घेतला. सध्या ती यूके आणि यूएईमध्ये काम करण्याच्या संधी शोधत आहे.
कृशांगीला फिनटेक, ब्लॉकचेन, आर्टिफिशअल इंटेलिजन्स, आणि ग्राहकांसाठीच्या कायदेशीर सेवा यांसारख्या आधुनिक क्षेत्रांमध्ये विशेष रुची आहे.
भविष्यात, कृशांगीचे उद्दिष्ट यूके किंवा यूएईमधील एखाद्या आघाडीच्या कायदा फर्ममध्ये काम करून डिजिटल तंत्रज्ञान आणि ग्राहक-केंद्रित कायदेशीर सेवांच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देण्याचे आहे.