
महिलांवरील लैगिंक छळाच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. असं एकही क्षेत्र नाही जिथे महिलांवरील अत्याचाराची घटना घडली नाही. शाळा असो कंपन्या असो अथवा चित्रपटसृष्टी प्रत्येक ठिकाणी महिलांना लैगिंक छळाचा सामना करावा लागत आहे. अशा अनेक घटना यापूर्वी समोर आल्या आहेत. क्रिकेट जगतातही ही कीड पोहचली असून यामुळे हिंदुस्थानच्या एका गोलंदाजानंतर आता पाकिस्तानच्या फलंदाजावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे.
पाकिस्तानचा 24 वर्षीय फलंदाज हैदर अली पाकिस्तान-A संघासह इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला आहे. याच दरम्यान त्याच्यावर एका तरुणीने बलात्कार आणि मारहाण केल्याचा आरोप केला. त्यामुळे त्याला ग्रेटर मँचेस्टर पोलिसांनी अटक केलं होतं. हा सर्व प्रकार उघडीकस येताच त्याला तात्काळ PCB ने निलंबित केलं आहे. दरम्यान, त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. पोलिसांचा तपास सुरू असून या सर्व घटनेत जर पीडित तरुणीचं वय 16 वर्षांपेक्षा कमी असेल तर, हैदर अलीवर मोठी कारवाई करण्यात येईल. इंग्लंडमध्ये बलात्काराच्या आरोपामध्ये दोषी आढळलेल्यांना 4 वर्षांपासून ते 19 वर्षांपर्यंत शिक्षा सुनावली जाते, lawtonslaw वेबसाईटवर तशी माहिती उपलब्ध आहे. हैदर अली व्यतिरिक्त हिंदुस्थानचा वेगवान गोलंदाज यश दयालवरही एका तरुणीने बलात्काराचा आरोप केला आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचं प्रतिनिधीत्व करण्याच्या प्रतिक्षेत असणारा वेगवान गोलंदाज यश दयाल गेल्या काही दिवसांमध्ये बलात्काराच्या आरोपांमुळे चर्चेत होता. आयपीएलमध्ये आरसीबीकडून त्याने चांगली कामगिरी केली होती. याच्यावर एका तरुणीने लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी राजस्थान उच्च न्यायालयात सुनावनी सुरू आहे. त्याला अटेकपासून संरक्षण देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला होता. आता पुढील सुनावनी 22 ऑगस्ट रोजी होणार आहे.