
इंडोनेशियाने ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करण्यासाठी हिंदुस्थानसोबत करार केला आहे, अशी माहिती इंडोनेशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवत्ते रिको रिकार्डो सिरैत यांनी दिली. हा करार लष्करी हार्डवेअर आणि संरक्षण क्षमतांच्या आधुनिकीकरणाचा भाग आहे. ब्रह्मोस हे एक सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे, जे पाणबुडी, जहाज, विमान किंवा जमिनीवरून कुठूनही डागले जाऊ शकते. 19 एप्रिल 2024 ला फिलिपिन्सला ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रांची पहिली खेप सुपूर्द केली होती.
महिला कर्मचाऱ्यांसाठी रेल्वेकडून शाइन अॅप लाँच
रेल्वेत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱयांसाठी रेल्वेने शाइन नावाचे एक अॅप लाँच केले आहे. या अॅपवरून महिला कर्मचाऱयांना कामाच्या ठिकाणी होणाऱ्या छळाची तक्रार नोंदवता येईल. हे अॅप अंतर्गत तक्रार समितीने 1997 च्या नियमानुसार खास डिझाईन केले आहे. या अॅपमध्ये तक्रार करणाऱ्या महिला तक्रारदाराची माहिती गोपनीय ठेवली जाणार आहे. शाइन अॅपद्वारे महिला कर्मचारी ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट सिस्टमद्वारे तक्रार नोंदवू शकतात. महिलेने तक्रार केल्यास ही तक्रार थेट तक्रार समितीपर्यंत पोहोचेल.
गोल्ड ईटीएफमधील गुंतवणूक 78 टक्क्यांनी घटली
गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड्स अर्थात ईटीएफमधील गुंतवणुकीत फेब्रुवारीमध्ये घसरण झाली आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी 2026 मध्ये गोल्ड ईटीएफमध्ये जवळपास 5 हजार 255 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. ही गुंतवणूक जानेवारी महिन्याच्या तुलनेत खूपच कमी आहे. जानेवारीमध्ये ईटीएफमध्ये गुंतवणूक ही 24 हजार 039 कोटी रुपयांची झाली होती. शेअर बाजारात काही निवडक क्षेत्रांमध्ये आलेल्या सुधारणेनेही गुंतवणूकदारांचे लक्ष सोन्यावरून हटवून पुन्हा इक्विटीकडे वळवले आहे.
पाकिस्तानी लष्कराकडून सात निर्दोष लोकांची हत्या
पाकिस्तानी लष्कराने सात बलूच नागरिकांची हत्या केल्याचा गंभीर आरोप एका मानवधिकार संघटनेने केला आहे. बलूच नॅशनल मूव्हमेंटच्या मानवधिकार विभाग (पाक) ने केलेल्या आरोपानुसार, पाकिस्तानी लष्कराने बलूच लोकांवर अत्याचार करणे सुरूच ठेवले आहे. वेगवेगळ्या भागांतील बलूच नागरिकांना बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवून नंतर त्यांची पाकिस्तानी लष्कराकडून हत्या करण्यात आली आहे, असा आरोप मानवधिकार संघटनेने केला आहे. लष्कराकडून सध्या किल अँड डंप हे धोरण अवलंबिले जात आहे, असेही मानवधिकार संघटनेने म्हटले आहे. बलुचिस्तानला न्याय मिळायला हवा, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.
कतारमध्ये 16 मार्चपर्यंत सीबीएसईच्या परीक्षा स्थगित
इस्रायल–इराण युद्धाचा फटका आखाती देशांना बसला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (सीबीएसई) ने परीक्षासंबंधी नवीन सर्क्युलर जाहीर केले आहे. कतारमध्ये भारतीय दूतावासाने दोहा येथील सर्व विद्यालयामधील 12 मार्च ते 16 मार्चदरम्यान होणाऱ्या 12 वीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. या परीक्षेच्या नवीन तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. 14 मार्चला पुन्हा एकदा बैठक घेऊन युद्धाची परिस्थिती पाहून 16 मार्चनंतर या परीक्षेवर अंतिम निर्णय घेतला जाईल. युद्धामुळे केवळ कतारच नाही तर बहरीन, इराण, कुवैत, ओमान, सौदी अरब आणि यूएईमध्येही 9, 10, 11 मार्चला होणारी परीक्षा पुढे ढकलली आहे.



























































