
पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक सागरी वाहतुकीवर परिणाम होत असताना, हिंदुस्थानसाठी महत्त्वाची दिलासादायक घडामोड समोर आली आहे. हिंदुस्थानचा ध्वज असलेले ‘ग्रीन सान्वी’ हे सातवे LPG टँकर शुक्रवारी होर्मुझ सामुद्रधुनी पार करून पुढे सरकले. यापूर्वी सहा LPG वाहतूक करणारी जहाजे ही सामुद्रधुनी पार करून सुरक्षितपणे हिंदुस्थानी बंदरांवर पोहोचली आहेत. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.
असे असले तरी, परिस्थिती पूर्णपणे सुरळीत नसून अजूनही 17 हिंदुस्थानी जहाजे होर्मुझ सामुद्रधुनीच्या पश्चिमेस अडकलेली आहेत. यामध्ये ‘ग्रीन आशा’ आणि ‘जग विक्रम’ या दोन LPG टँकरचा समावेश असून ही जहाजेही लवकरच हिंदुस्थानकडे रवाना होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दोन्ही जहाजांनी पर्शियन आखातातील अबू मुसा बेटाच्या ईशान्य दिशेला थांबून हिंदुस्थानी नौदलाच्या सूचनांनुसार हालचाली करण्यासाठी प्रतीक्षा सुरू ठेवली होती.
दरम्यान, आणखी एक महत्त्वाची घडामोड म्हणजे इराणहून हिंदुस्थानकडे येत असल्याचे सांगितले जाणारे एक परदेशी कच्चे तेलवाहू जहाज प्रवासादरम्यान अचानक आपला मार्ग बदलून चीनकडे वळले आहे. ‘पिंग शुन’ नावाचे हे जहाज सुरुवातीला गुजरातमधील कांडला येथील दीनदयाल बंदरातील वाडीनार प्रकल्पाकडे येत असल्याचे दर्शवले होते. या जहाजावर सुमारे 6 लाख बॅरल कच्चे तेल असल्याचे सांगितले जाते. मात्र सध्या ते चीनमधील डोंगयिंगकडे जात असल्याचे सिग्नल देत आहे.
जागतिक विश्लेषक संस्था Kpler चे प्रमुख विश्लेषक सुमित रिटोलिया यांनी सांगितले की, इराणी कच्च्या तेलाच्या व्यवहारांमध्ये अशा प्रकारे प्रवासादरम्यान गंतव्य (Destination) ठिकाण बदलणे नवीन नाही. मात्र सध्याच्या परिस्थितीत देयक पद्धती आणि आर्थिक अटी अधिक कडक झाल्यामुळे अशा बदलांची शक्यता वाढली आहे. पूर्वी 30 ते 60 दिवसांच्या उधारीवर होणारे व्यवहार आता कमी होत असून, विक्रेते त्वरित किंवा आगाऊ पेमेंटवर भर देत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
तज्ज्ञांच्या मते, जर देयकासंदर्भातील अडचणी दूर झाल्या, तर हे जहाज पुन्हा हिंदुस्थानकडे वळू शकते. विशेष म्हणजे, जर हे जहाज प्रत्यक्षात वाडीनार येथे पोहोचले असते, तर गेल्या सहा वर्षांनंतर हिंदुस्थानला इराणकडून कच्च्या तेलाची पहिली खेप मिळाली असती.
दरम्यान, जहाजांच्या ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टमद्वारे दाखवले जाणारे गंतव्य अंतिम असतेच असे नाही. त्यामुळे ‘पिंग शुन’ हे जहाज पुढील प्रवासात पुन्हा आपला मार्ग बदलू शकते, अशी शक्यताही वर्तवली जात आहे.

























































