विशेष – भारतीय अंतराळ स्थानकाचे वेध

>> प्रा. विजया पंडित

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रो ही संस्था गेल्या सात दशकांपासून भारताच्या विज्ञान, तंत्रज्ञान व स्वाभिमानाचे भक्कम प्रतीक ठरली आहे. उपग्रह प्रक्षेपणापासून ते चांद्रयान, मंगळयान व सौरयानापर्यंत अनेक स्वप्नांना तिने सत्यात उतरवले. आता या यशाच्या पायावर इस्रो एक नवे ध्येय पूर्ण करण्याच्या तयारीत आहे, ते म्हणजे भारतीय अंतराळ स्थानक. या स्वदेशी अंतराळ स्थानकाच्या निर्मितीमुळे भारत अंतराळ क्षेत्रात अधिक आत्मनिर्भर व जागतिक स्पर्धेसाठी सक्षम होईल. शुभांशु शुक्ला यांच्या यशस्वी आगमनानंतर भारताच्या अंतराळ संशोधनातील आशाअपेक्षा उंचावल्या आहेत.

भारताच्या शुभांशु शुक्ला यांनी आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष स्थानकावर  18 दिवसांचा प्रवास पूर्ण केल्यानंतर अलीकडेच आनंदाने पृथ्वीवर पुनरागमन केले. हे केवळ वैयक्तिक यश नसून तो भारताच्या मानवी अंतरिक्ष मोहिमेच्या महत्त्वाकांक्षांना मूर्त स्वरूप मिळवून देणारा ऐतिहासिक टप्पा आहे. या यशामुळे भारतीय अंतराळ क्षेत्राच्या इतिहासात एक महत्त्वाचा मैलाचा दगड रोवला गेला आहे. भारताला मानवी अंतराळ उड्डाणाचा फारसा अनुभव नाही. त्यामुळे शुभांशु शुक्ला यांच्यासारख्या मोहिमा अधिक महत्त्वाच्या ठरतात. मानव अंतराळ प्रवास हे अत्यंत गुंतागुंतीचे क्षेत्र आहे. अनेक प्रगत राष्ट्रे यामध्ये अपयशी झाली आहेत. या पार्श्वभूमीवर शुभांशु शुक्लांची ही अंतराळ सफर आणि त्यातील आंतरराष्ट्रीय अनुभव हा भारतासाठी अनमोल ठरेल.  ही वाटचाल आता भारताच्या स्वदेशी मानवी अंतराळ मोहिमेसाठी (गगनयान) भक्कम आणि वैज्ञानिकदृष्टय़ा पडताळलेला पाया निर्माण करणारी ठरली आहे. गगनयान मिशनबरोबरच भारत आपले स्वतचे अंतराळस्थानक तयार करण्याच्या प्रयत्नात आहे.

सध्या अवकाशात आयएसएस आणि चीनचे अवकाश स्थानक काम करत आहे. या अवकाश स्थानकांच्या मदतीने अंतराळ संशोधनाला मोलाची चालना मिळाली आहे. स्थानकात मुक्कामास येणारे अंतराळवीर संशोधन कार्ये करत नवनवीन तथ्ये उलगडत आहेत. येणाऱया काळात अवकाश संशोधनाची व्याप्ती आणखी वाढणार असून यात भारताच्या स्वतच्या अवकाश स्थानकाची गरज मोठय़ा प्रमाणावर आहे. यादृष्टीने नियोजन आणि तयारी केली जात आहे.

भारतासारखा विकसनशील देश हा आगामी दहा वर्षांत स्वत:चे अवकाश स्थानक तयार करण्याची घोषणा करेल, याची कल्पनाही कोणी केली नव्हती. मात्र 23 ऑगस्ट 2023 रोजी चांद्रयान-3 ला चंद्राच्या दक्षिण धृवावर यशस्वीपणे उतरविणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला. चंद्रावर चांद्रयानचे सॉफ्ट लॅण्डिंग झाल्यानंतर अवकाश स्थानकाबाबत केलेली घोषणा पाहून भारताच्या योजनेबाबत कोणाच्याही मनात शंका राहिली नाही. नजीकच्या काळात भारत अवकाश स्थानक बनवेल, यात कोणाचेही दुमत नाही.

तीन वर्षांनंतर प्रक्षेपण 

भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) 2028 पर्यंत पहिले आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक प्रक्षेपित करण्याची घोषणा केली. यानुसार 2028 मध्ये लाँच होणारे मॉडय़ूल एक रोबोटिक मॉडय़ूल असेल. म्हणजेच प्रयोग करण्याजोगा आणि परत आणण्याजोगा उपग्रह स्थापित करणे. मात्र मानवाला या अवकाश स्थानकात जाण्यासाठी आणखी दहा वर्षे वाट पाहावी लागणार आहे.

पहिल्या आयएसएसचे स्वरूप 

अवकाश स्थानक हे एक प्रकारे पृथ्वीच्या खालच्या कक्षेत  मॉडय़ूलर स्पेस स्टेशन किंवा राहण्याजोगा एक कृत्रिम उपग्रह असतो. जगातील पहिले अवकाश स्थानक म्हणून `साल्युट वन’ला ओळखले जाते. 19 एप्रिल 1971 रोजी तत्कालीन सोव्हियत रशियाने कझाकिस्तानच्या बायकोनूर कॉसमोड्रोमने सोडण्यात आले होते. हे स्थानक सुमारे 20 टन वजनाचे आणि लाटण्याच्या आकाराचे होते. त्याची लांबी बारा मीटर आणि रुंदी 4.25 मीटर होती. सिंगल डॉकिंग पोर्टच्या या अंतराळस्थानकाचा उद्देश अंतराळवीराच्या शरीरावर होणाऱया परिणामांचा अभ्यास करणे आणि अवकाशातून पृथ्वीचे छायाचित्र टिपणे हा होता.

सध्या दोन स्थानके सक्रिय

आतापर्यंत पृथ्वीच्या खालच्या कक्षेत दोन स्थानके सक्रिय आहेत. पहिले आयएसएस अणि दुसरे चीनचे `तियांगोंग’ अवकाश स्थानक म्हणजेच टीएसएन होय. पहिले अवकाश स्थानक  20 नोव्हेंबर 1998 रोजी सोडले होते. अमेरिकी अवकाश संशोधन संस्था `नासा’कडून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाचे कामकाज पाहिले जाते आणि ते एक बहुराष्ट्रीय सहकार्याने संचलित होणारे स्थानक आहे. यात पाच देशांच्या अवकाश संस्था सहभागी आहेत. यात अमेरिकेची नासा (नॅशनल एरोनॉटिस अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन) रशियाची रोस्कोस्मोस, जपानची जेएएएसए (जपान एरोस्पेस एस्प्लोरेशन एजन्सी), युरोपची ईएसए (युरोपीय स्पेस एजन्सी) आणि कॅनडाची सीएसए (कॅनाडियन स्पेस एजन्सी) यांचा समावेश आहे. या अंतराळ स्थानकामध्ये दोन बाथरूम, एक जीम आणि एक 360 अंश दृश्य दाखविणारी खिडकी.  या अवकाश स्थानकाची लांबी 109 मीटर आहे. 1984 आणि 1993 या काळात या स्थानकाची निर्मिती करण्यात आली. 2000 मध्ये या अवकाश स्थानकात जगातील वेगवेगळ्या देशांतील अंतराळवीरांनी राहण्यास सुरुवात केली. मुक्कामाच्या काळात अंतराळवीर अन्य ग्रहांचा अभ्यास करण्याबरोबरच विविध प्रयोग करत राहतात.  आयएसएस हे पृथ्वीपासून 400 किलोमीटर अंतरावरून पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत आहे. त्याचा वेग 28 हजार किलोमीटर प्रती तास आहे. हे स्थानक केवळ 90 मिनिटांतच पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण करते.

चीनचे तियांगोग हे कायमस्वरूपी प्रस्थापित स्थानक असून त्याची लांबी 55 मीटर किंवा 180 फूट आहे. यात तीन मोडय़ूल आहेत. यातील कोअर मोडय़ूलमध्ये सहा अंतराळवीर राहू शकतात. याशिवाय चीनच्या अवकाश स्थानकात 3884 युबिक फूट किंवा 110 युबिक मीटरचे दोन मॉडय़ूल आहेत. चीनचे अवकाश स्थानक हे नासाच्या अवकाश स्थानकाच्या तुलनेत लहान आहे. ते पृथ्वीपासून 450 किलोमीटर अंतरावर काम करते.

भारताच्या अवकाश स्थानकाचे स्वरूप 

`इस्रो`ने आपल्या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा 2019 मध्येच केली. येत्या दोन ते अडीच दशकांत भारताचे स्वत:चे अवकाशात स्थानक असेल असा विश्वास व्यक्त केला. संस्थेच्या मते, प्रस्तावित अवकाश स्थानकाच्या पहिल्या मॉडय़ूलचे वजन आठ टन असेल आणि कालांतराने ते 20 टनपर्यंत पोचेल. यात एकाच वेळी चार ते पाच अंतराळवीर सहा महिने राहू शकतात आणि त्याचे स्थान पृथ्वीच्या सर्वात खालच्या स्तरावर निश्चित करण्यात येईल. यास एलईओ (लोअर अर्थ ऑर्बिट) असे म्हणतात आणि ते साधारणपणे पृथ्वीपासून चारशे किलोमीटर अंतरावर असेल. गगनयान मिशनलादेखील भारत पृथ्वीच्या लोअर ऑर्बिटमध्येच मूर्त रूप देणार आहे. याच ठिकाणी आपले अवकाश स्थानक असेल. हे स्थानक दीर्घकाळ टिकणारे असेल व त्याच्या सहाय्याने जैविक प्रयोग, मानवी शरीरावर शून्य गुरुत्वाकर्षणाचा परिणाम, अंतराळ शास्त्र, ऊर्जा संशोधन, यांत्रिकी क्षेत्रातील संशोधन आदी गोष्टी शक्य होतील.

भारतीय अंतराळ स्थानक हे पूर्णपणे स्वदेशी असेल व ते उभारण्यासाठी भारताला मोठय़ा प्रमाणात निधी, संशोधन व वैज्ञानिक मनुष्यबळ यांची गरज भासेल. तसेच या प्रकल्पासाठी खाजगी उद्योग, शिक्षण संस्था व संशोधन संस्था यांचा सहभागदेखील अत्यावश्यक ठरणार आहे. सध्याच्या अंदाजांनुसार 2035 पर्यंत हे स्थानक कार्यान्वित होईल, असे मानले जाते.

इस्रोचे अंतराळ स्थानक हे गगनयान या महत्त्वाकांक्षी मानवी अंतराळ मोहिमेच्या पुढील टप्प्याशी जोडलेले आहे. गगनयानाच्या यशस्वी प्रयोगानंतर भारताकडे प्रशिक्षित अंतराळवीर, त्यांचे जीवनरक्षणासाठी आवश्यक तंत्रज्ञान, तसेच वैद्यकीय व मानसशास्त्राrय पायाभूत सुविधा तयार होतील. या अनुभवाच्या आधारेच अंतराळ स्थानकासाठी आवश्यक असलेले दीर्घकालीन जीवनसहायक तंत्रज्ञान, अंतराळात ऊर्जानिर्मितीचे तंत्र, जलशुद्धीकरण, वायुवीजन, अन्नपुरवठा यांसारख्या अत्यावश्यक बाबींची रूपरेषा निश्चित होईल.

अंतराळ स्थानकामुळे भारताला अनेक फायदे होतील. सर्वप्रथम, भारताला स्वतंत्रपणे अंतराळ संशोधन करता येईल. दुसरे म्हणजे भारतीय अंतराळवीरांना सातत्याने अंतराळात राहून प्रत्यक्ष अनुभव घेता येईल. तिसरे म्हणजे जागतिक पातळीवर भारताच्या अंतराळ संशोधनातील दृष्टिकोनाला व संशोधन क्षमतेला मान्यता मिळेल. चौथे म्हणजे आज अमेरिका किंवा रशियावर अवलंबून असणाऱया विकसनशील देशांना अशा स्थानकाच्या माध्यमातून भारत सेवा देऊ शकतो.

या प्रकल्पाच्या यशासाठी इस्रोने आधीच काही महत्त्वाच्या तांत्रिक चाचण्या व विकासप्रािढया सुरू केल्या आहेत. यात कृत्रिम गुरुत्वाकर्षण निर्मिती, दीर्घकालीन ऊर्जास्रोत, जलपा व्यवस्थापन, मानवी शरीराच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या संरचना, अंतराळातील विकिरणापासून संरक्षण यांसारख्या बाबींचा समावेश आहे.

अंतराळ स्थानकासाठी भारताला केवळ प्रक्षेपण यानांची क्षमता वाढवावी लागणार नाही, तर दीर्घकाळ टिकणाऱया व पुन: पुन्हा वापरता येणाऱया यानांची गरज भासेल. तसेच भारताला अंतराळात तांत्रिक दुरुस्ती करणारे रोबोटिक तंत्रज्ञान विकसित करावे लागेल. हे सगळे करताना जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी अत्यंत अचूक नियोजन, सातत्याने होणारे तांत्रिक सुधारणा व दीर्घकालीन धोरण आवश्यक आहे.

आज भारतीय अंतराळ स्थानक ही कल्पना जरी काहीशी दूर वाटत असली, तरी इस्रोच्या आतापर्यंतच्या यशाचा मागोवा घेतला, तर ही वाटचाल अशक्य वाटत नाही. चांद्रयान, मंगळयान, आदित्य एल-वन यासारख्या प्रकल्पांनी भारताने जगाला दाखवून दिले आहे की अत्यंत कमी खर्चातही उच्च दर्जाच्या यशस्वी मोहिमा राबविता येतात. त्यामुळे भारतीय अंतराळ स्थानक हे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल, असा विश्वास बळावतो आहे.

भारतीय अंतराळ स्थानक हे केवळ वैज्ञानिक प्रयोगांचे केंद्र न राहता भविष्यात व्यापार, औद्योगिक संशोधन, अंतराळ पर्यटन व जागतिक सहकार्याचा नवा अध्याय लिहिणारे असेल. भारतासाठी ही गोष्ट केवळ सत्तेचा किंवा प्रतिष्ठेचा विषय नाही, तर विज्ञान, तंत्रज्ञान व मानवी उपांतीसाठी केलेली एक दूरदृष्टीपूर्ण गुंतवणूक असणार आहे. अंतराळाच्या या नव्या पर्वात भारताची उपस्थिती निश्चितच अधिक ठोस व निर्णायक ठरेल, यात शंका नाही.