
हिंदुस्थानच्या अंकिता रैनाने आपलीच देश सहकारी आकांक्षा नित्तुरेचा पराभव करून एल अँड टी मुंबई ओपन डब्ल्यूटीए महिला टेनिस स्पर्धेत पात्रता फेरीच्या पहिल्या चरणात वर्चस्व गाजवले. क्रिस्टिना सिडोरोव्हा, कुलिकोव्हा एनास्तेसिया, झुजाना पावलीकोस्का, मात्सुदा मिसाकी, निकोल फोस्सा हुएर्गो, पेंगतारण प्लिपुच, यास्मी कब्बाज यांनीही स्पर्धेत विजयी सलामी दिली.
मुंबई येथील एमएसएलटीएच्या टेनिस कोर्टवर ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत पहिल्या पात्रता फेरीत रशियाच्या क्रिस्टिना सिडोरोव्हा हिने २६ वर्षीय झील देसाईचा ६-२, ६-० असा सहज पराभव केला. सामन्यात १९ वर्षीय क्रिस्टिना हिने सुरुवातीपासूनचा आक्रमक खेळ करत झीलला सूर गवसण्याची फारशी संधी दिली नाही. फिनलंडच्या कुलिकोव्हा एनास्तेसियाने नाओको इटोचा ६-०, ६-० असा एकतर्फी पराभव केला. १५ वर्षीय युवा खेळाडू पार्थसारथी मुंढेला झुजाना पावलीकोस्काकडून ७-६ (१), २-६, ३-६ असा पराभव पत्करावा लागला.























































