सलग पराभवांमुळे हिंदुस्थानचे उपांत्य फेरीतील स्थान संकटात

हिंदुस्थानी महिला संघाला 330 धावा केल्यानंतरही ऑस्ट्रेलियाकडून पराभवाची झळ सोसावी लागली. सलग दोन पराभवांमुळे हिंदुस्थानी महिला संघाचे विश्वचषकातील उपांत्य फेरीमधील स्थान संकटात आले आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार एलिसा हिलीच्या 142 धावांच्या धडाकेबाज खेळीने हिंदुस्थानचे 331 धावांचे आव्हान सहा चेंडू आणि तीन विकेट राखून सहज पार पाडले. हा महिला क्रिकेटमधील सर्वात मोठ्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग ठरला आहे. हिंदुस्थानने स्मृती मानधना (80) आणि प्रतिका रावल (75) यांच्या 155 धावांची दमदार भागीदारामुळे त्रिशतकी टप्पा गाठता आला. पण शेवटच्या सहा विकेट्स फक्त 36 धावांत गमावल्याने संघाचा आकडा 330 वर थांबला.

या धावांना ऑस्ट्रेलियन कर्णधार एलिसाने जोरदार उत्तर दिले. तिने 107 चेंडूंत 142 धावा ठोकत हिंदुस्थानच्या आव्हानातील हवा काढली. 32 धावांवर जखमी निवृत्त झालेल्या एलिस पेरीने शेवटच्या क्षणी पुन्हा मैदानात उतरत ऑस्ट्रेलियाच्या विक्रमी विजयावर 49 व्या षटकांत शिक्कामोर्तब केले. पेरीने किम गार्थबरोबर 28 धावांची भागी रचत संघाला संस्मरणीय विजय मिळवून दिला. हिंदुस्थानच्या या पराभवामुळे हिंदुस्थानच्या सेमीफायनलच्या शक्यता धूसर झाल्या असून इंग्लंड, न्यूझीलंड आणि बांगलादेशविरुद्धचे उर्वरित सर्व सामने जिंकणे गरजेचे ठरणार आहे.

स्मृती मानधनाचा पराक्रम!

हिंदुस्थानची स्टार खेळाडू स्मृती मानधनाने महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये आणखी एक ऐतिहासिक पराक्रम आपल्या नावावर केला. ती महिला वन डे क्रिकेटमध्ये पाच हजार धावा पूर्ण करणारी सर्वात वेगवान आणि सर्वात कमी वयाची खेळाडू ठरलीय. मानधनाने आपल्या 112 व्या सामन्यात हा मैलाचा टप्पा गाठताना वेस्ट इंडीजच्या स्टेफनी टेलरचा (129 सामन्यांत) विक्रम मोडीत काढला. तसेच महिला वन डेत सूजी बेट्स (136), मिताली राज (144) आणि शार्लेट एडवर्ड्स (156) यांनीही पाच हजार धावा केल्या आहेत.