
कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आयआयटी मुंबई आणि एनटीपीसी लिमिटेड यांनी संयुक्तपणे देशातील पहिली कार्बन डायऑक्साईड साठवणूक चाचणी विहीर यशस्वीरीत्या पूर्ण केली. देशाच्या हवामान बदलविरोधी प्रयत्नांतील हे महत्त्वाचे पाऊल समजले जात आहे.
आयआयटी मुंबईच्या पृथ्वी विज्ञान विभागाने देशातील प्रमुख कोळसा क्षेत्रांमध्ये कार्बन साठवणुकीची शक्यता तपासण्यासाठी सविस्तर अभ्यास केला. या अभ्यासांतर्गत चार मोठय़ा कोळसा क्षेत्रांचा आढावा घेऊन प्रथमच भूवैज्ञानिक साठवणुकीचा नकाशा तयार करण्यात आला. या संशोधनाच्या आधारे झारखंडमधील उत्तर करनपुरा कोळसा क्षेत्रातील पाकरी-बरवाडीह परिसरात देशातील पहिली कार्बन डायऑक्साईड साठवणूक चाचणी विहीर खोदण्यास सुरुवात करण्यात आली.
हा प्रकल्प नीती आयोगाच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला आहे. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकल्पांची भूमिका निर्णायक ठरेल, असा विश्वास नीती आयोगाचे सदस्य व्ही.के. सारस्वत यांनी व्यक्त केला.
आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. शिरीष केदारे यांनी संशोधन प्रत्यक्ष क्षेत्रात उतरल्यामुळे देशाच्या ऊर्जा संक्रमण प्रक्रियेला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
n सुमारे 1,200 मीटर खोलीपर्यंत खोदलेली ही विहीर 15 नोव्हेंबर रोजी पूर्ण झाली. याच ठिकाणी दुसऱया विहिरीचे कामही सुरू करण्यात आले असून या दोन्ही विहिरींच्या माध्यमातून कार्बन डायऑक्साईड सुरक्षितपणे जमिनीत साठवता येते का, याची प्रत्यक्ष चाचणी घेतली जाणार आहे. या उपक्रमासाठी एनटीपीसीची संशोधन शाखा ‘नेट्रा’ आणि आयआयटी मुंबई यांनी संयुक्तपणे काम केले.






























































