
देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद-गोहाना-सोनीपत या ट्रॅकवर धावण्यासाठी सज्ज झाली आहे. यासाठी जिंदमध्ये एक आधुनिक हायड्रोजन प्लांट बांधला जात असून इंजिनदेखील तयार करण्यात आले आहे. जर्मनी, फ्रान्स, स्वीडन आणि चीननंतर ही टेक्नोलॉजी स्वीकारणारा हिंदुस्थान जगातील पाचवा देश बनेल. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांच्या एक्स हँडलवर देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनचा व्हिडीओ शेअर केला आहे. या मार्गावर धावणारी ही ट्रेन जगातील सर्वात लांब आणि सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन असणार आहे. तसेच यामध्ये 2,638 प्रवासी वाहून नेण्यास सक्षम असेल.
ट्रेनला 110 ते 140 प्रति तास वेग
ही ट्रेन 89 किमी लांबीच्या जिंद-गोहाना-सोनीपत ट्रकवर 110 ते 140 किमी प्रतितास वेगाने धावेल. या ट्रेनला इंधन देण्यासाठी जिंदमध्ये एक मेगावॅट पॉलिमर इलेक्ट्रोलाइट मेम्ब्रेन प्लांटचे बांधकाम सुरू आहे. या प्लांटमधून दररोज सुमारे 430 किलो हायड्रोजन तयार होईल.