फॉलोऑनच्या नामुष्कीनंतर विंडीजची झुंज, तरीही कसोटीवर हिंदुस्थानचा दबदबा कायम

हिंदुस्थान आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी तिसऱ्या दिवशी ‘फॉलोऑन’ हा शब्द जणू पुन्हा जिवंत झाला. तोही विंडीजच्या नामुष्कीने! पहिल्या डावात माती खालेल्या विंडीजने दुसऱ्या डावात थोडाफार आत्मसन्मान वाचवत 2 बाद 173 अशी धावसंख्या गाठली आणि खेळ संपता संपता हिंदुस्थानी गोलंदाजांची थोडी झोपमोड केली. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा जॉन कॅम्पबेल (88) आणि शाय होप (66) ही जोडी खेळत होती. झुंजार खेळ करत असलेल्या विंडीजला डावाचा पराभव टाळण्यासाठी अजून 97 धावांची गरज आहे. कसोटीत संघर्ष दिसत असला तरी कसोटीचा निकाल चौथ्या दिवशीच लागणार, हे जवळजवळ निश्चित आहे.

आज कुलदीप यादव आणि रवींद्र जाडेजा या फिरकीवीरांनी विंडीजचा पहिला डाव 248 धावांत संपवत त्यांच्यावर फॉलोऑनचे संकट लादले. कुलदीपने 5 आणि जाडेजाने 3 विकेट घेत 148 धावांत 8 फलंदाज गारद केले. दोघांच्या फिरकीपुढे विंडीजचे गोलंदाज नतमस्तक झाले. जेटली मैदानाच्या खेळपट्टीवर फिरकीस्त्राने कसोटी तिसऱ्या दिवसांत संपवण्याचे संकेत दिले होते. पण कॅम्पबेल आणि होपने संघर्षमय खेळ करत 138 धावांची स्फूर्तिदायक भागी केली. हा भागीने मरणासन्न अवस्थेत असलेल्या विंडीज संघाच्या जिवात जीव आला.

विंडीजचा पहिला डाव 248 धावांवर गुंडाळत हिंदुस्थानने 270 धावांची आघाडी घेतली आणि ‘फॉलोऑन देऊन टाकूया!’ असा निर्णय घेतला. हा निर्णय म्हणजे ‘पार्लरमध्ये बसून केस सेट करणाऱ्या’ संघव्यवस्थापनाचा नव्हता. हा होता ‘दबदबा दाखवणाऱ्या’ हिंदुस्थानचा आत्मविश्वास.

विंडीजने लाज राखली

फॉलोऑननंतर विंडीजची सुरुवात तशी ‘नेहमीसारखीच’ झाली. म्हणजे पडझडीने सुरुवात आणि नंतर थोडं सांभाळून खेळणं. मोहम्मद सिराजने चंदरपॉलला नेहमीप्रमाणे पुल शॉटवर पकडून बाहेर पाठवलं, तर वॉशिंग्टन सुंदरने ‘गुगली की फिरकी?’ असा प्रश्न विचारत अथानेझचा स्टंप उडवला. पण त्यानंतर जॉन कॅम्पबेल आणि शाय होप यांनी ‘झुंजार’ फलंदाजी करत हिंदुस्थानी गोलंदाजांना थोडं काम दिलं. कॅम्पबेलचं नशीबही त्याच्याशी होतं. सुंदरच्या चेंडूंवर तो दोनदा पायचीत होता होता वाचला. त्यानंतर या जोडीने संयमाने खेळ करत दिवसाचा खेळ संपवला, पण आपली विकेट गमावली नाही.

दोघांनी जाडेजा आणि कुलदीपवर एकाच ओव्हरमध्ये सलग चौकार आणि षटकार ठोकत ‘आता थोडं आमचंही ऐका’ असा संदेश दिला. दुसरीकडे शाय होपने एकेरी-दुहेरीतून फॉर्म सावरला आणि वॉशिंग्टनवर एक जबरदस्त लॉग-स्विप षटकार ठोकून फॉर्म जाहीर केला. या जोडीने 138 धावांची भागीदारी करत वेस्ट इंडीजचा या मालिकेत ‘एकही सत्र चांगला गेला नाही’ हा शाप मोडीत काढला.

फॉलोऑन टाळण्याचे जोरदार प्रयत्न

विंडीजच्या दिवसाची सुरुवात खराब झाली. त्यांचे आघाडीचे फलंदाज बाद होत गेले. कुलदीप-जाडेजाने विंडीजच्या मधल्याफळीचेही कंबरडे मोडत 8 बाद 175 अशी बिकट अवस्था केली. इथेच ते फॉलोऑनच्या संकटात अडकले. पण खॅरी पिअरे, जेडन सिल्स आणि अ‍ॅण्डरसन फिलीप यांनी 73 धावांची भर घालत हिंदुस्थानच्या गोलंदाजांना झुंजवले. 248 विंडीजचा डाव संपवल्यानंतर ‘टीम इंडिया’चा फॉलोऑनचा निर्णय हा धाडसी होता. कारण 80 हून अधिक षटके गोलंदाजी करून पुन्हा लगेच फिल्डवर उतरणे म्हणजे ‘संध्याकाळी सिनेमा पाहिल्यावर लगेचच धावायला जाणं!’ पण हिंदुस्थानचा आत्मविश्वास इतका प्रचंड आहे की, धोका पत्करायलाही ते तयार होते. पहिल्या डावात 82 षटके गोलंदाजी केल्यानंतर दुसऱ्या डावात 49 षटके फेकली. पण ही षटके विंडीजच्या फलंदाजांना अडचणीत आणण्यात अपयशी ठरली. झुंजार खेळानंतरही विंडीज पराभवाच्या छायेखाली आहे. हा सामना पाचव्या दिवसापर्यंत खेचण्यात पाहुणे यशस्वी ठरले तर हे त्यांच्यासाठी सामना बरोबरीत सोडवल्याचे समाधान देणारा असेल.