
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवासी विमानाचे पहिले टेकऑफ येत्या २५ डिसेंबर रोजी होणार आहे. ख्रिसमसच्या मुहूर्तावर विमानसेवा सुरू होत असल्याचा बोलबाला सर्वत्र होत असला तरी त्याच दिवशी देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचीही जयंती आहे. त्यामुळे विमानतळाच्या टेकऑफचा मुहूर्त नेमका कोणता, ख्रिसमसचा की अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचा, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. वाजपेयी यांच्या जयंतीदिनी नवी मुंबईतून विमानाच्या उड्डाणाचा शुभारंभ होणार असल्याने विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव लागणार की नाही याबाबत स्थानिक भूमिपुत्रांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मंजुरी मिळाल्यानंतर या विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी स्थानिक भूमिपुत्रांनी केली. तसा प्रस्ताव राज्य सरकारने सुमारे तीन वर्षांपूर्वी केंद्र सरकारकडे पाठवला. मात्र अद्यापपर्यंत या प्रस्तावावर नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ८ ऑक्टोबर रोजी दुपारी झाले. त्यावेळी मोदी यांनी विमानतळाच्या नावाबाबत कोणतीही घोषणा केली नाही. या उद्घाटन सोहळ्यानंतर विमानतळ हाताळणाऱ्या कंपनीने २९ ऑक्टोबर रोजी विमानतळाचा ताबा सीआयएसएफकडे दिला.
पहिल्या टप्प्यात अकासा आणि इंडिगो या दोन विमान कंपन्या नवी मुंबई विमानतळावरून प्रवासी सेवा सुरू करणार आहेत. पहिले टेकऑफ २५ डिसेंबर रोजी होणार आहे. याच दिवशी ख्रिसमस आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती असल्याने नेमका मुहूर्त कोणता, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूला राज्य सरकारने अचानक माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचे नाव दिले. त्यानंतर विमानतळाच्या टेकऑफचा शुभारंभ वाजपेयी यांच्या जयंतीदिनीच ठेवला आहे. त्यामुळे नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाबाबत शंका उपस्थित होऊ लागली आहे.
३ डिसेंबरपर्यंत वाट पाहणार
दिबांचे नाव विमानतळाला देण्यासाठी आगरी कोळी समाजाने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने बैठक बोलवली होती. या बैठकीत त्यांनी दोन महिन्यांत दिबांचे नाव विमानतळाला देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. तोपर्यंत दिबांचे नाव विमानतळाला लागले नाही तर पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसण्यात येणार आहे, अशी प्रतिक्रिया आगरी कोळी युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष नीलेश पाटील यांनी दिली आहे.


























































