इंडिगोचा गोंधळ… नागपूरला पोहोचण्यासाठी आमदारांची दमछाक; चंद्रकांतदादा, सिद्धार्थ शिरोळे पुण्यातून चार्टर्ड फ्लाईटने आले

नागपूरमध्ये उद्यापासून सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनासाठी अनेक आमदारांनी इंडिगो विमानाचे बुकिंग केले. मात्र यावेळी इंडिगोच्या गोंधळामुळे नागपूर गाठण्यासाठी अक्षरशः दमछाक झाली. कोथरूडचे आमदार आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी चक्क चार्टर्ड  फ्लाईट करून नागपूर गाठले. काही आमदारांना रेल्वेत टू टायर एसी ऐवजी थ्री टायर एसीमध्ये सीट मिळाले ते पवित्र मानून नागपूरकडे कुच केले.

पश्चिम महाराष्ट्रातील आमदार हे पुणे आणि मुंबईमधून विमानाची चांगली सेवा असल्याने रेल्वे अथवा स्वतःच्या वाहना ऐवजी विमान सेवेला पसंती देतात. यंदा इंडिगो विमान सेवेच्या गोंधळाने त्यांचे नियोजन कोलमडले. अगोदर तिकीट काढून देखील विमाने रद्द झाली. काल सायंकाळपर्यंत अनेक आमदार इंडिगोची सेवा सुरळीत होईल म्हणून वाट पाहत होते. परंतु प्रत्यक्षात विमानसेवेची परिस्थिती आणखी बिकट झाल्याने त्यांची नागपूरची वाट देखील बिकट केली. ऐनवेळी पर्यायी मार्ग अवलंबून बारा ते चौदा तासांचा प्रवास करून नागपूर गाठावे लागले.

नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती

सध्या विमानांची गैरसोय आहे. अधिवेशनासाठी कोणत्याही आमदारांना उशीर होऊ नये, त्यांची गैरसोय होऊन नये ते वेळेवर पोहोचावे यासाठी राज्य विधिमंडळाच्या वतीने नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आल्याचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी सांगितले.

विमानाचे तिकीट, हॉटेलचे दर वाढले..

पुणे आणि मुंबईमधून नागपूरकडे येणाऱ्या अन्य विमान कंपन्यांच्या विमानांचे तिकिटाचे दोन ते तीन पटीने वाढले आहेत. तर दुसरीकडे नागपूरमधील तारांकित हॉटेलने त्यांचे दर देखील अवाच्या सवा केले आहेत. बुकिंगसाठी रूमचा आजचा दर 35 ते 45 हजार रुपये प्रतिदिन असा आहे. मंत्र्यांसाठी सिविल लाईन परिसरात कॉटेज बंगले, रवी भवन त्याचबरोबर आमदारांसाठी आमदार निवास अशी निवासाची व्यवस्था असली तरी बहुसंख्य आमदार आणि मंत्री हे हॉटेलमध्ये राहतात. त्यामुळे हॉटेलचे बुकिंग देखील फुल झाले.