
इंडोनेशिया मास्टर्स सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेत हिंदुस्थानची मोहीम दोन दिवसांतच संपुष्टात आली. उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागल्यानंतर हिंदुस्थानची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला अव्वल चीनच्या मानांकित चेन यू फेइकडून सरळ गेममध्ये 21-13, 21-17 असा पराभव सहन करावा लागला. तसेच लक्ष्य सेनलाही हार पत्करावी लागली.
हा सामना नाटय़मय घडामोडींनी गाजला. दुसऱ्या गेममध्ये 12-17 ने पिछाडीवर असताना लाईन का@लवर नाराजी व्यक्त केल्यामुळे सिंधूला आधी पिवळे आणि नंतर लाल कार्ड दाखवण्यात आले. पंचांच्या हस्तक्षेपानंतर लाल कार्ड मागे घेण्यात आले. त्यानंतर सिंधूने जोरदार पुनरागमन करत फरक 17-18 पर्यंत कमी केला, मात्र निर्णायक क्षणी गती राखण्यात अपयश आल्याने पराभव तिच्या वाटय़ाला आला. चेन यू फेईने पहिल्या गेमपासूनच आक्रमक खेळ करत सिंधूवर पूर्ण वर्चस्व गाजवले.
दरम्यान, हिंदुस्थानचा युवा शटलर लक्ष्य सेनलाही स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला. थायलंडच्या पानीचापोन तिरारात्सापुलने त्याचा 20-18, 22-20 असा पराभव केला. सिंधू आणि लक्ष्य यांच्या पराभवामुळे इंडोनेशिया मास्टर्स 2025 मधील हिंदुस्थानची मोहीम पूर्णतः संपली.






























































