हिंदुस्थान-पाकिस्तान सीमेवर घुसखोरीचा इशारा, सुरक्षेच्या कारणास्तव पठाणकोट सीमावर्ती भागात शोध मोहीम सुरू

punjab border jawan

हिंदुस्थान-पाकिस्तान सीमेवर घुसखोरीच्या शंकेच्या पार्श्वभूमीवर पठाणकोटच्या सीमावर्ती भागात बीएसएफ आणि पोलिसांच्या संयुक्त शोध मोहिमेला वेग आला आहे. गेल्या एका आठवड्यापासून गुप्तचर यंत्रणांकडून घुसखोरीचे इनपुट मिळत असल्याने सुरक्षा दल हाय अलर्टवर आहेत.

विशेषतः पहाडीपूर आणि उज्ज नदी किनाऱ्यावरील भागात ही मोहीम तीव्र करण्यात आली आहे. गुरुवारी इंस्पेक्टर ऑपरेशन गुलशन कुमार यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त पथकाने परिसरात तपास सुरू केला आहे. उच्च अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार ही रूटीन तपासणी सुरू असून, आगामी काही दिवसांतही ती चालू राहणार आहे.

धुक्याच्या वातावरणामुळे दृश्यमानता कमी झाली असून, सकाळी आणि संध्याकाळी घुसखोरीची शक्यता वाढते. यामुळे संवेदनशील ठिकाणी प्रत्येक कोपऱ्यात तपासणी केली जात आहे. शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना बाहेरील संशयित व्यक्ती दिसल्यास तात्काळ सरपंच किंवा पोलिसांना कळवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.