हिंदुस्थानच्या ‘कसोटी’नंतर इंग्लंडचे ‘बॅझबॉल’ , पहिल्या डावात हिंदुस्थानच्या 358 धावा; इंग्लंडच्या सलामीवीरांची आक्रमक शतकी खेळी

बुधवारी सावध आणि संयमी खेळ करणाऱ्या हिंदुस्थानने ऋषभ पंतच्या जिगरी अर्धशतकामुळे पहिल्या डावात 358 धावा केल्या. मात्र हिंदुस्थानी फलंदाजांना कसोटी खेळ करण्यास भाग पाडणाऱ्या इंग्लंडने आपल्या फलंदाजीत बॅझबॉल शैलीची फटकेबाजी करत दुसऱ्या दिवसअखेर 2 बाद 225 अशी जबरदस्त मजल मारली. 166 धावांची सलामी देणाऱ्या झॅक क्रावली (84) आणि बेन डकेट (94) या दोघांचीही शतके थोडक्यात हुकली.

हिंदुस्थानने पहिल्या दिवसाच्या 4 बाद 264 धावसंख्येवरून दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू केला, पण धावसंख्येत अवघी दोन धावांची भर घातली आणि जाडेजा बाद झाला. आज हिंदुस्थानच्या डावात 94 धावांची भर पडली. पहिल्या दिवशी प्रत्येकी 19 धावांवर नाबाद असलेले रवींद्र जाडेजा व शार्दुल ठाकूर दुसऱ्या दिवशी मैदानावर उतरले, मात्र जाडेजा केवळ एका धावेची भर घालून 20 धावांवर माघारी परतला. जोफ्रा आर्चरने त्याला ब्रुककरवी झेलबाद केले. त्यानंतर शार्दुल ठाकूर (41) व आलेला वॉशिंग्टन सुंदर (27) ही जोडी जमली. या दोघांनी 48 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. बेन स्टोक्सने शार्दुलला डकेटकरवी झेलबाद करून ही जोडी फोडली.

अन् पंत मैदानात परतला!

बुधवारी पाय फ्रॅक्चर  झाल्याने 37 धावांवर रिटायर्ड हर्ट झालेला ऋषभ पंत आज मैदानावर परतला. जखमी असूनही संकटमोचकच्या भूमिकेत मैदानावर उतरलेल्या पंतला बघताच स्टेडियमवर उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी उभे राहून टाळय़ांच्या गजरात त्याला मानवंदना दिली. मग बेन स्टोक्सने सुंदर व त्याच्या जागेवर आलेला पदार्पणवीर अंशुल कम्बोजला (0) एकाच षटकात बाद करीत हिंदुस्थानची 109.5 षटकांत 8 बाद 337 अशी अवस्था केली. दरम्यान ऋषभ पंतने 75 चेंडूंच्या खेळीत 3 चौकार व 2 षटकारांसह कारकीर्दीतील 17 वे कसोटी अर्धशतक पूर्ण केले. जोफ्रा आर्चरने एका अप्रतिम चेंडूवर त्रिफळा उडवून पंतची झुंजार खेळी संपुष्टात आणली. बाद होऊन माघारी परतणाऱ्या पंतचे कौतुक करण्याचा मोह इंग्लिश खेळाडूंना टाळता आला नाही. त्यानंतर आर्चरनेच जसप्रीत बुमराला (4) यष्टीमागे स्मिथकरवी झेलबाद करून हिंदुस्थानचा डाव संपविला. मोहम्मद सिराज 5 धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने 5, तर जोफ्रा आर्चरने 3 विकेट टिपले.

डकेटक्राऊलीचा राडा

हिंदुस्थानी फलंदाजांची दमछाक करताना त्यांना झुंजवणाऱ्या इंग्लिश संघाने मात्र ओल्ड ट्रफर्डवर आपला बॅझबॉल खेळ दाखवत राडा घातला.  लॉर्ड्सवर बॅझबॉल म्यान करणाऱ्या इंग्लिश सलामीवीरांनी आपल्या फटकेबाजीला पुन्हा एकदा बॅझबॉलचा रंग दिला. डकेट आणि क्रावलीने जसप्रीत बुमराच्या गोलंदाजीला काहीसा सन्मान दिला, पण पर्दापणवीर अंशुल कम्बोज, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठापूर या तिन्ही वेगवान गोलंदाजांना अक्षरशः फोडून काढत 166 धावांची घणाघाती सलामी दिली. गेल्या दोन्ही कसोटी सामन्यांत अपयशी ठरलेल्या या सलामीवीरांनी आज मनमुराद फटकेबाजी केली. डकेटने लीड्समध्ये 62 आणि 149 धावांचा झंझावात आणला होता. त्यानंतर गेल्या चारही डावांत तो न चांगली सलामी देऊ शकला होता  न चांगली खेळी. हीच अवस्था झॅक क्रावलीची होती. मात्र आज दोघांनी तुफान फटकेबाजी केली. दोघेही शतके झळकवणार असे दिसत असताना त्यांची शतके हुकली. क्रावलीने 113 चेंडूंत 84 तर डकेटने 100 चेंडूंत 94 धावा ठोकल्या. दोघांच्या झंझावातामुळे इंग्लंडने 46 षटकांत 225 धावा चोपून काढत चौथ्या कसोटीवर संघाला वर्चस्व मिळवून देण्याचे प्रयत्न केले. खेळ थांबला तेव्हा ऑली पोप 20 तर ज्यो रुट 11 धावांवर खेळत होता.