प्रसिद्ध सोशल मीडिया हँडल Instagram ची सेवा गेल्या काही तासांपासून ठप्प झाल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. X वर अनेक युजर्सनी पोस्ट केलं आहे. अनेकांनी मेटाच्या सेवेवर नाराजी व्यक्त केली आहे. सर्वच युजर्सना हा त्रास जाणवत नसला तरी काही युजर्सना इंस्टाग्राम ठप्प झाल्यानं अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे सोशल मीडिया ॲप्स आणि वेबसाइट्स इत्यादींची माहिती ठेवणारी वेबसाइट डाउनडिटेक्टरवरही अनेक वापरकर्त्यांनी तक्रार केली.
Downdetecter वर दिसणाऱ्या रिपोर्टनुसार, इंस्टाग्रामची सेवा सकाळी पावणे अकरा वाजल्यापासून ठप्प आहे. त्यामुळे लोकांनी या वेबसाईटवर आपल्या तक्रारी नोंदवण्यास सुरूवात केली. यानंतर सुमारे साडे अकरा वाजेपर्यंत 1900 हून अधिक लोकांनी इन्स्टाग्राम वापरता येत नसल्याची तक्रार नोंदवली होती. याशिवाय लोकांनी X वर देखील या बातमीची माहिती दिली. यासाठी लोकांनी अनेक पोस्ट शेअर केल्या.
हिंदुस्थानात Instagram हे ॲप वापरणाऱ्यांची संख्या कोटींच्या घरात आहे. याच कारणामुळे इन्स्टाग्रामची सेवा काही सेकंदांसाठी बंद पडली तर सोशल मीडियावर एकच गोंधळ सुरू होतो. सोशल मीडियावरील लोकांनी इंस्टाग्राम डाउन असल्याचा पुरावा म्हणून स्क्रीनशॉट शेअर केला. परंतु ही समस्या सर्व युजर्सना जाणवत नाही. आजच्या समस्येबाबत इन्स्टाग्रामची मूळ कंपनी मेटाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.