पारंपारिक शेतीऐवजी नवीन वाट स्विकारली, निवृत्त सैनीकाने केला हळद लागवडीचा अनोखा प्रयोग

निसर्गाचा असमतोलपणा आणि खर्चिक होत चाललेल्या पारंपारिक शेती पिकांना फाटा देत हातीप येथील हितेश प्रकाश जांभळे या सेवानिवृत्त सैनिकांने आपल्या वयोवृध्द वडिलांच्या साथीने हळद लागवड करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी भाडे तत्वावर जमीन घेतली या जमिनीवर जिद्द मेहनत चिकाटीच्या जोरावर कष्ट उपसत त्यांनी मोठ्या प्रमाणात हळद लागवड केली आहे.

भारतीय सैन्य दलातून सेवा निवृत्त झाल्यानंतर काय करावे या विचारात असताना. हितेश जांभळे यांनी शेतीच करण्याचा निर्णय घेतला. मात्र कोकणात केल्या जाणाऱ्या भात वा नागली किंवा अन्य भाजीपाल्याची शेती न करता आपण काहीतरी वेगळी शेती करायची हा त्यांनी निश्चय केला आणि त्यासाठी त्यांनी ज्या शेती लागवडीच्या पिकाला वन्य प्राण्यांचा त्रास होत नाही असे पिक निवडावयाचे ठरवले. असे कोणतं पिक आहे की ज्या पिकांच्या लागवडीला वन्य प्राण्यांचा त्रास होत नाही तसेच ज्या उत्पादनाला बाजारात मागणी आहे. असा विचार समोर ठेवून हितेश जांभळे यांनी आपल्या वडिलांच्या एकुणच अनुभवाने हळद लागवड करण्याचा धाडसी निर्णय घेतला. गाठीशी म्हणावा तसा फार मोठा पूर्वानुभव नसताना त्यांनी सांगली जिल्ह्यातून सेलम जातीच्या वाणाची 2 हजार किलो कंद लागवडीसाठी आणली. 27 मे 2025 रोजी लागवडीला सुरुवात केली. अशी ही लागवड केलेली हळदीची शेती चांगलीच तरारली आहे. साधारणपणे फेब्रुवारी 2026 च्या अखेरीस किंवा मार्च महिन्याच्या सुरुवातीला हळदीचे कंद काढले जातील. तेव्हा ख-याअर्थाने नेमके उत्पादन समजून येईल. मात्र तरारलेल्या हळदीच्या रोपांवरून हळदीची लागवड यशस्वी झाल्याचा अंदाज बुजूर्ग शेतकरी वर्तवित आहेत.

दापोली तालुक्यातील हातीप येथील हितेश जांभळे यांनी सैन्य दलातून सेवा निवृत्त झाल्यानंतर आपल्याच गावातील एका जमिनदाराकडून भाडेतत्त्वावर जमीन घेऊन तेथे मोठ्या प्रमाणात हळदीची लागवड केली . अगदी हम रस्त्याच्या कडेलाच असलेली हळदीची शेती या मार्गांवरून कोणीही जाणाऱ्यांच्या नजरेला सहज दिसते. पावणे तीन एकरात 2 हजार किलो सेलम जातीच्या वाणाच्या हळदीची केलेली लागवड ही तालुक्यातील शेतकऱ्यांना आदर्श घेण्याजोगी अशाच प्रकारची लागवड आहे. कारण हळदीची लागवड करताना त्यांनी कोणत्याही शासकीय कृषी अधिकाऱ्यांची मदत न घेता त्यांचा सल्ला न घेताच शिवाय लागवड यशस्वी होईल न होईल याचा बाहू न करता जिद्दीने त्यांनी हळदीची लागवड केली आहे. कष्ट आणि मेहनत करायची तयारी असेल तर काही गोष्टी साध्य करता येतात हेच जांभळे यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.