
सध्याचे युग हे डिजिटल युग म्हणून ओळखले जाते. डिजिटल युगात विमा खरेदी करणे खूपच सोपे झाले आहे, परंतु विमा घेताना ग्राहकांना डार्क कॅडर्न्सनाही सामोरे जावे लागत आहे. लोकल सर्कलच्या एका सर्वेक्षणानुसार, 10 पैकी 8 जण ‘सबस्क्रिप्शन ट्रॅप’सारख्या समस्यांना तोंड देत आहेत. याचाच अर्थ पॉलिसी घेणे सोपे आहे, परंतु ती रद्द करणे अवघड झाले आहे. मागील दोन वर्षांत ‘सबस्क्रिप्शन ट्रॅप’चे प्रकार 61 टक्क्यांवरून थेट 80 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत, असे या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 85 टक्के युजर्सनी सांगितले की, विमा कोटेशन घेताना त्यांच्याकडून अनावश्यक माहिती मागितली जाते, परंतु नंतर याच माहितीचा वापर नको असलेल्या मार्केटिंग कॉल्स आणि मेसेज पाठवण्यासाठी केला जातो. विमा कंपनीकडून जर केवळ कोटेशन घेतले किंवा पॉलिसी रद्द करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना वारंवार कॉल आणि मेसेज करून त्रास दिला जातो. 82 टक्के युजर्सनी ‘बेट अँड स्विच’चा अनुभव घेतला. म्हणजे जाहिरातीत कमी प्रीमियम दाखवला गेला, परंतु पेमेंट करताना दर वाढले.

























































