नवी मुंबई विमानतळावर इंटिग्रेटेड पॅसेंजर ट्रायल; 25 डिसेंबरच्या उड्डाणाचे काऊंटडाऊन सुरू

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा तपासणी, बोर्डिंग प्रक्रिया आणि बॅगेज क्लेम आदी यंत्रणांची तपासणी करण्यासाठी घेण्यात आलेली इंटिग्रेटेड पॅसेंजर ट्रायल यशस्वी झाली आहे. ही चाचणी गेल्या दोन दिवसांपासून सुरू होती. या कालावधीत सुमारे १ हजार ८०० कर्मचाऱ्यांनी प्रवासी बनून विमानतळावर प्रवेश करून विमानापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्वच प्रक्रिया पूर्ण केल्या. ही चाचणी यशस्वी झाल्यामुळे या विमानतळावरून येत्या २५ डिसेंबर रोजी होणाऱ्या उड्डाणाचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे.

प्रवाशांनी विमानतळावर प्रवेश केल्यानंतर त्यांना विमानापर्यंत जाण्यासाठी अनेक प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. या सर्व प्रक्रिया किती कालावधीत पूर्ण होतात हे जाणून घेण्यासाठी शनिवारपासून विमानतळावर इंटिग्रेटेड पॅसेंजर ट्रायल सुरू करण्यात आली. गेले दोन दिवस या चाचणीमध्ये प्रत्येक दिवशी सुमारे ८०० कर्मचारी प्रवासी म्हणून सहभागी झाले. त्यांची नियमानुसार सीआयएसएफच्या जवानांनी तपासणी केली. सुरक्षा तपासणी झाल्यानंतर त्यांना बोर्डिंग पास देण्यात आले. लगेज क्लेम आणि अन्य प्रक्रिया पार पडल्यानंतर हे प्रवासी विमान प्रवासासाठी तयार झाले. मात्र आज झालेल्या चाचणीमध्ये विमान प्रवासाचा समावेश नव्हता.

दोन दिवस प्रवाशांची चेकइन, सुरक्षा व्यवस्था, बोर्डिंग आणि बॅगेज रिक्लेम आदी प्रक्रियांची चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्यामुळे सीआयएसएफ, एल अॅण्ड टी, एअरलाइन पार्टनर्स यांचे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड या कंपनीने आभार मानले आहे.

नवी मुंबई विमानतळावर इंटिग्रेटेड पॅसेंजर ट्रायल यशस्वी झाल्यानंतर या चाचणीचा व्हिडीओ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड या कंपनीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.