कश्मीरात शोधमोहीम तीव्र; 3 हजार जण ताब्यात, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांनी कसून चौकशी सुरू

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर गेल्या 8 दिवसांत सुरक्षा दलांनी कश्मीरात दहशतवाद्यांची तीव्र शोधमोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत तब्बल 3 हजारांहून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे. अटक करण्यात आलेले बहुतांश दक्षिण कश्मीरमधील लोक आहेत. दहशतवाद्यांना स्थानिक लोकांनी मदत केल्याचा सुरक्षा दलाला संशय आहे.

20हून अधिक ओवर ग्राऊंड वर्कर्सना पकडले असून त्यांची कसून चौकशी सुरू असल्याचे एनआयएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. भलवाल कारागृहातील दोघांचीही चौकशी सुरू आहे. त्यांनी दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोप आहे.

एलओसीवर गोळीबार सुरूच

पाकिस्तानकडून गेल्या आठ दिवसांपासून रोज रात्री एलओसीवर गोळीबार सुरूच असून हिंदुस्थानी लष्कराकडून त्याला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. कुपवाडा, बारामूला, पूँछ, नौशेरा आणि अखनूर येथे पाकिस्तानी सैन्याकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे.

शाहबाज शरीफ यांचा यूटय़ूब चॅनेल ब्लॉक

हिंदुस्थानने पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे यूटय़ूब चॅनेल हिंदुस्थानात बंद केले आहे. शरीफ यांच्या चॅनेलबरोबरच प्रसिद्ध पाकिस्तानी चॅनेल हम टीव्ही आणि एआरवाय डिजिटल यांच्यावरही बंदी घालण्यात आली आहे. हे चॅनेलही आता हिंदुस्थानात दिसणार नाही.

दहशतवाद्यांनी बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांनी बेताब खोऱ्यात शस्त्रे लपवून ठेवली होती असे एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या प्राथमिक तपासात आढळून आले आहे. हल्ल्याच्या नियोजनात आणि अंमलबजावणीत पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लश्कर-ए-तोयबा, इंटर सर्व्हिसेस इंटेलिजेंस आणि पाकिस्तानी लष्करातील घटकांचा सहभाग असल्याचे ठोस पुरावे समोर आले आहेत.

पीओकेतील सर्व मदरसे दहा दिवस बंद

तब्बल एक हजारांहून अधिक मदरसेही दहा दिवसांसाठी बंद करण्यात आले आहेत. हिंदुस्थानकडून येथील मदरसे तसेच धार्मिक ठिकाणांना दहशतवाद्यांची प्रशिक्षण केंद्रे समजून हल्ले करू शकतो. हे लक्षात घेऊन ही ठिकाणे बंद ठेवण्यात आली आहेत. दुसरीकडे हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील संबंध तणावाचे बनले असताना पाकिस्तानला अंतर्गत आंदोलने आणि पीओकेतील जनतेच्या रोषाचा सामना करावा लागतोय. या पार्श्वभूमीवर पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ या पक्षाच्या समर्थकांचे आंदोलन थांबवण्यासाठी आणि देशातील अशांतता कमी करण्यासाठी तुरुंगात असलेल्या माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि संरक्षण मंत्री असीम मुनीर यांनी याचना केली आहे.